रंजीत मस्के प्रतिनिधी
अकोला : सोशल मीडियावर बनावट नोकरीच्या जाहिराती देऊन बेरोजगारांना जाळ्यात ओढत लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीवर अकोला सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ८,०८,४३० रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून मुख्य आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने १६ डिसेंबर २०२४ रोजी सायबर पोलीस स्टेशन, अकोला येथे तक्रार दाखल केली होती. सोशल मीडियावर दिसलेल्या नोकरीच्या जाहिरातीवर क्लिक केल्यानंतर आरोपींनी तिच्याशी संपर्क साधला. टेलिग्राम व व्हॉट्सअॅपद्वारे संवाद साधत “वर्क फ्रॉम होम”च्या नावाखाली दरमहा मोठ्या उत्पन्नाचे आमिष दाखवण्यात आले. सुरुवातीला काही रक्कम परत करून विश्वास संपादन करण्यात आला, त्यानंतर विविध टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम उकळण्यात आली.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली. तपासादरम्यान सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, बँक व्यवहार आणि डिजिटल पुरावे तपासून आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला. त्यानुसार मुंबई येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी पोलीस स्टेशन सायबर, अकोला येथे गुन्हा क्र. ३१२/२०२४ अन्वये भादंवि कलम ४२०, ४०६ तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.
या कारवाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले असून पोलीस अधीक्षक अजित चांडक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जुंबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीषा तायडे पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत केंदरे, महिला पोलीस उपनिरीक्षक किरण वानखेडे तसेच चालक पोलीस शेख कराळे यांनी सलग समन्वय साधत ही कारवाई यशस्वी केली.
सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सोशल मीडियावरील आकर्षक नोकरीच्या जाहिरातींवर विश्वास ठेवण्यापूर्वी संबंधित कंपनीची खातरजमा करावी. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये किंवा कोणालाही आर्थिक व्यवहार करू नयेत. संशयास्पद प्रकार आढळल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा.


