मुंबई प्रतिनिधी
सर्वसामान्यांना परवडणाऱ्या घरांची प्रतीक्षा असलेल्या नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या मुंबई मंडळाने तब्बल २,६४० घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीसाठी इच्छुक अर्जदारांना सोमवारपासून दुपारी ३ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज करता येणार असून, पात्र अर्जदारांसाठी १५ मे रोजी सकाळी ११ वाजता संगणकीय सोडत काढली जाणार आहे.
म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सोमवारी ऑनलाइन अर्ज नोंदणीसाठीचा ‘गो-लाईव्ह’ कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर लॉटरीसाठीची नोंदणी प्रक्रिया अधिकृत संकेतस्थळावर सुरू केली जाणार आहे.
मुंबईतील विविध भागांमध्ये घरे
या लॉटरीमध्ये मुंबईतील अनेक भागांतील गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव, दादर आदी भागांतील प्रकल्पांचा समावेश आहे.
कन्नमवारनगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थनगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरिवली, गोराई-बोरिवली, सुभाषनगर-चेंबूर, गांधीनगर-वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, अँटॉप हिल-वडाळा आदी ठिकाणी विविध उत्पन्न गटांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
पुनर्विकास प्रकल्पांमधील घरेही समाविष्ट
या सोडतीमध्ये १,७६२ बांधकामाधीन सदनिकांचा समावेश आहे. याशिवाय विकास नियंत्रण नियमावली ३३(५) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पांतून विकसकांकडून म्हाडाला मिळालेल्या ३७१ सदनिका आणि नियमावली ३३(७) अंतर्गत मिळालेल्या १८८ सदनिकांसह इतर विखुरलेली घरेही या लॉटरीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
उत्पन्न गटानुसार घरांचे वाटप
या लॉटरीत विविध उत्पन्न गटांसाठी घरांचे वाटप करण्यात आले आहे.
अत्यल्प उत्पन्न गट (EWS) – १४५ घरे
अल्प उत्पन्न गट (LIG) – ८५८ घरे
मध्यम उत्पन्न गट (MIG) – १,४०८ घरे
उच्च उत्पन्न गट (HIG) – २२९ घरे
अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिक अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी, तर अल्प उत्पन्न गटातील नागरिक अल्प व मध्यम गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांना मध्यम व उच्च गटासाठी अर्ज करता येईल. मात्र उच्च उत्पन्न गटातील अर्जदारांना केवळ उच्च उत्पन्न गटासाठीच अर्ज करता येणार आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
म्हाडाने अर्ज प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून दिली आहे. अर्जदारांना ‘म्हाडा गृहनिर्माण लॉटरी प्रणाली’ या मोबाईल ॲपद्वारे अर्ज करता येणार आहे. हे ॲप Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
तसेच अर्जदारांना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही अर्ज नोंदणी, अर्ज भरणा आणि पेमेंट प्रक्रिया पूर्ण करता येईल.
महत्त्वाच्या तारखा
* ऑनलाइन अर्जाची अंतिम मुदत: २९ एप्रिल, रात्री ११.५९
अनामत रक्कम भरण्याची अंतिम मुदत: ३० एप्रिल, रात्री ११.५९
* प्राप्त अर्जांची प्रारूप यादी: ५ मे
* दावे व हरकती दाखल करण्याची मुदत: ८ मे
* अंतिम पात्र अर्जदारांची यादी: १२ मे
* ऑनलाइन सोडत: १५ मे
उत्पन्न मर्यादा
* अत्यल्प उत्पन्न गट: वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यंत
* अल्प उत्पन्न गट: वार्षिक उत्पन्न ९ लाख रुपयांपर्यंत
* मध्यम उत्पन्न गट: वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपर्यंत
* उच्च उत्पन्न गट: वार्षिक उत्पन्न १२ लाख रुपयांपेक्षा अधिक
मुंबईसारख्या महागड्या शहरात परवडणारे घर मिळवण्याची ही संधी मानली जात असून, हजारो इच्छुक नागरिक या लॉटरीकडे लक्ष ठेवून आहेत.


