सातारा प्रतिनिधी
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीदरम्यान झालेल्या गदारोळामुळे सातारा जिल्हा परिषद सध्या राज्यभर चर्चेत असतानाच जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवरून राजकीय वाद तापलेला असतानाही जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी ४ एप्रिल रोजी विशेष सभा बोलावण्यात आली असून ही प्रक्रिया जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या दिवशी झालेल्या गोंधळामुळे साताऱ्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या बैठकीदरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. या घटनेत त्यांच्या हाताला दुखापत झाल्याचेही सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकारामुळे राज्याच्या विधिमंडळातही हा मुद्दा गाजला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, या निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जिल्हा परिषद सदस्यांना मतदानासाठी पोहोचण्यापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा मुद्दा विरोधकांनी जोरदारपणे उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, ज्या सदस्याच्या कथित अपहरणाची तक्रार देण्यात आली होती, त्या सदस्याने नंतर लेखी निवेदन देत आपले अपहरण झाले नसून आपण स्वतःहून पक्षासोबत गेलो असल्याचे स्पष्ट केले होते. तरीही संबंधित दोन सदस्यांना मतदानाची संधी न देता पोलिसांनी उचलल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे.
याच दरम्यान आणखी एक वादग्रस्त आरोपही समोर आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जिल्हा परिषद सदस्याचा हात जबरदस्तीने भाजपच्या बाजूने वर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे साताऱ्यात फेरनिवडणुकीची मागणी जोर धरू लागली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पुढील प्रक्रिया सुरू ठेवत विषय समित्यांच्या सभापती निवडीसाठी ४ एप्रिल रोजी विशेष सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत समाज कल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती, कृषी व पशुसंवर्धन समिती तसेच बांधकाम व आरोग्य समिती या महत्त्वाच्या समित्यांच्या सभापतीपदासाठी निवडणुका होणार आहेत.
या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी ४ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांच्याकडे नामनिर्देशन अर्ज सादर करावेत, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. उमेदवारी अर्जांचे नमुने त्याच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
दुपारी १२ ते १२.३० या वेळेत प्राप्त अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १२.३० ते १ या वेळेत अर्ज माघारी घेण्याची संधी दिली जाईल. आवश्यक असल्यास दुपारी १ नंतर मतदान घेण्यात येऊन त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
एकीकडे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवरून राजकीय संघर्ष तीव्र होत असतानाच प्रशासनाने विषय समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय घेतल्याने साताऱ्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


