सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळानंतर सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. निवडणुकीच्या मतदानावेळी पालकमंत्री शंभुराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांच्याशी धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. या प्रकरणावरून विधिमंडळात मोठा गदारोळ झाला असून संबंधित पोलिसांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी या प्रकरणाची दखल घेत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह संबंधित पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले. यामुळे राज्याच्या पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.
आयपीएस तुषार दोशी यांचे नाव यापूर्वीही अनेक वादांमुळे चर्चेत आले आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. या प्रकरणानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.
तुषार दोशी हे २००१ बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांचे पहिले पोस्टिंग चंद्रपूर येथे झाले होते. राजुरा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर पुणे पोलीस दलात सायबर विभागाचे उपायुक्त, नवी मुंबई येथे पोलीस उपायुक्त अशी विविध पदे त्यांनी भूषवली. २०१८ मध्ये एजाज खान अटक प्रकरण आणि अश्विनी बिद्रे-गोरे हत्या प्रकरणामुळेही ते चर्चेत आले होते.
सातारा जिल्ह्यात बदली झाल्यानंतर फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातही त्यांचे विधान वादग्रस्त ठरले होते. या प्रकरणात एका पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते आणि त्या तपासाच्या पार्श्वभूमीवर दोशी यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा झाली होती.
दरम्यान, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील गोंधळावरून मंत्री शंभुराज देसाई यांनी विधिमंडळात संताप व्यक्त करत पोलिसांनी मंत्र्यांना आरोपीप्रमाणे ओढत नेल्याचा आरोप केला. या घटनेनंतर तुषार दोशी यांच्यावर कारवाईची मागणी अधिक तीव्र झाली असून पुन्हा एकदा ते वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.


