संगमनेर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अॅसिड हल्ल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या संतापजनक घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या विधिमंडळात उमटले असून, विविध पक्षांच्या नेत्यांनी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी करत सरकारला सवालांच्या भडिमाराला सामोरे जावे लागले.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात कायदा-सुव्यवस्था राहिली आहे की नाही, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. शाळकरी मुलीवर अॅसिड हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब असून अशा घटनांमुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे पटोले यांनी नमूद केले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत आरोपीला कोणत्याही परिस्थितीत शोधून काढलेच पाहिजे, अशी मागणी केली. सहावीच्या निष्पाप मुलीवर अॅसिड फेकण्यासारखा अमानुष प्रकार घडत असेल तर अशा गुन्हेगारांवर कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे, असे त्या म्हणाल्या. अॅसिड हल्ल्यासाठी वापरलेले रसायन आरोपीला नेमके कुठून मिळाले याचाही तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी करत आरोपीला शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण आम्ही सोडणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली.
या प्रकरणावर राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली. वडगावपान हा ग्रामीण भाग असल्याने त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे तपासात काही अडथळे येत असल्याचे त्यांनी सांगितले. हल्लेखोर हा गावातीलच एखादा तरुण असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही त्यांनी नमूद केले. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल आणि त्याला बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे घडलेल्या या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून ती भीतीच्या धक्क्यात असल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणाचा तपास संगमनेर पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे. स्थानिक गुन्हे शाखा, फॉरेन्सिक पथक तसेच मोबाईल सेल यांच्याकडून हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तांत्रिक तपासासोबतच परिसरातील नागरिकांची चौकशीही करण्यात येत असून लवकरच आरोपीचा उलगडा होईल, असा विश्वास वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.


