मुंबई प्रतिनिधी
दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान सुरू असलेल्या सामूहिक कॉपीच्या प्रकारांवर अखेर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा दणका दिला आहे. परीक्षा प्रक्रियेची शुचिता राखण्यासाठी मंडळाने राज्यभरात कठोर पावले उचलत तब्बल १०३ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मंडळाच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कठोर कारवाई मानली जात असून शिक्षण क्षेत्रात या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
अर्थात राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेत सीसीटीव्ही फुटेज, गुप्त पथके आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अनेक परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार उघडकीस आले.
सीसीटीव्हीच्या ‘तिसऱ्या डोळ्या’ने उघड केले गैरप्रकार
परीक्षा केंद्रांवर पारदर्शकता वाढवण्यासाठी मंडळाने यंदा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था अधिक बळकट केली होती. या कॅमेऱ्यांच्या मदतीने अनेक केंद्रांवर शिक्षकच विद्यार्थ्यांना कॉपीसाठी मदत करत असल्याचे धक्कादायक दृश्य समोर आले.
सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केल्यानंतर संबंधित केंद्रांवरील शिक्षक व कर्मचाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात आली. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना उत्तरं सांगणे, कॉपीचे साहित्य वाटप करणे, तसेच नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणे असे प्रकार स्पष्टपणे दिसून आले.
दोषींवर निलंबनासोबत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया
या प्रकरणात दोषी आढळलेल्या १०३ शिक्षकांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. एवढ्यावरच न थांबता, ज्या शिक्षकांनी परीक्षा प्रक्रियेची गोपनीयता भंग केली किंवा गैरप्रकारांना प्रोत्साहन दिले, त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे.
मंडळाने स्पष्ट केले आहे की, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही.
बीड आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई
बिड जिल्ह्यातील चौसाळा येथील कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात १० फेब्रुवारी रोजी पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपीचा प्रकार उघड झाला. या प्रकरणात १७ कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय यशवंत विद्यालयाचे केंद्र संचालक ए. एम. राऊत यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात पर्यवेक्षकच विद्यार्थ्यांना कॉपीसाठी मदत करत असल्याचे सीसीटीव्हीत स्पष्ट झाले. या प्रकरणी २४ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवून २१ जणांना निलंबित करण्यात आले आहे.
वाशिम जिल्हा बनला गैरप्रकारांचा केंद्रबिंदू
वाशिम जिल्ह्यात सर्वाधिक गैरप्रकार उघडकीस आले आहेत. जुमडा फाटा येथील श्री मैनागिरी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्राच्या पेपरदरम्यान तब्बल ५८१ विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
याशिवाय जिल्ह्यातील इतर अनेक केंद्रांवरही कारवाई करण्यात आली आहे.
• शेंदूर्जाना आढाव – ३ कर्मचारी निलंबित
• रुईगोस्ता – ५ कर्मचारी निलंबित
• मांडवा – ७ कर्मचारी निलंबित
• रिसोड – ३ कर्मचारी निलंबित
• लेहणी केंद्र – २ कर्मचारी निलंबित
मराठवाड्यातही कारवाईचा बडगा
जालना जिल्ह्यातील मंठा येथे इंग्रजीच्या पेपरमध्ये कॉपीला मदत करणाऱ्या ५ पर्यवेक्षकांना तात्काळ हटवण्यात आले.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे तर धक्कादायक प्रकार समोर आला. येथे तोतया (डमी) विद्यार्थी परीक्षा देताना पकडला गेला. या प्रकरणात केंद्रप्रमुख आणि पर्यवेक्षिकेसह संबंधित विद्यार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील सलगरा केंद्रावर ९ विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले. त्यापैकी ६ विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन आढळले. या प्रकरणात ३ शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून आणखी ३ कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
गडचिरोलीत ‘हायटेक’ कॉपीचा पर्दाफाश
गडचिरोली जिल्ह्यातील ब्रोमनवार विद्यालयात राज्यशास्त्राच्या पेपरदरम्यान ‘हायटेक’ कॉपीचा प्रकार समोर आला. विद्यार्थ्यांकडे मायक्रोनोट्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने तयार केलेले मुद्रित साहित्य आढळले.
या प्रकरणी ३ शिक्षक आणि १ शिपायावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्षण व्यवस्थेला धक्का
दहावी-बारावीच्या परीक्षा या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानल्या जातात. मात्र, शिक्षकच नियम मोडून सामूहिक कॉपीला मदत करत असल्याचे उघड झाल्याने शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे की, आगामी काळातही सीसीटीव्ही आणि विशेष तपास पथकांच्या मदतीने अशा गैरप्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.


