छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी
अंबादास दानवे यांना अज्ञात व्यक्तींनी जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते असलेल्या दानवे यांनी या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मार्च ते १४ मार्च या कालावधीत त्यांना अज्ञात व्यक्तींकडून वारंवार दूरध्वनी आले. या दूरध्वनींवरून “ठोकून काढू, कापून टाकू” अशा शब्दांत जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. सलग चार दिवस अशा प्रकारचे इशारे मिळाल्याने दानवे यांनी याबाबत अधिकृत तक्रार नोंदवण्याचा निर्णय घेतला.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ९५९५९५९३०३ या भ्रमणध्वनी क्रमांकावरून त्यांना सतत संपर्क साधण्यात येत होता. विशेष म्हणजे १५ मार्च रोजी पहाटे १ वाजून ५४ मिनिटांनी, त्यानंतर १ वाजून ५५ मिनिटांनी आणि पुन्हा २ वाजता अशा सलग वेळांत दूरध्वनी करून शिवीगाळ तसेच धमक्या देण्यात आल्या. या वेळी तीन ते चार व्यक्ती दूरध्वनीवरून बोलत असल्याचा संशय दानवे यांनी व्यक्त केला आहे.
या प्रकारामुळे स्वतःच्या तसेच कुटुंबीयांच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याची भीती दानवे यांनी आपल्या पत्रात व्यक्त केली आहे. त्यामुळे या घटनेची तात्काळ आणि सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
दरम्यान, दानवे यांना अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्याची माहिती समोर आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर शहरात शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित आरोपींना तातडीने शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
अलीकडील काळात विविध राजकीय मुद्द्यांवर दानवे यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. छत्रपती संभाजीनगर परिसरातही त्यांनी अनेक प्रश्नांवर ठामपणे आवाज उठवला होता. त्यामुळेच त्यांना धमक्या देण्यात आल्या असाव्यात का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी नोंद घेतली असून संबंधित भ्रमणध्वनी क्रमांकाच्या आधारे तपासाची चक्रे फिरू लागली आहेत. धमक्या देणारे नेमके कोण, त्यामागे कोणाचा हात आहे का आणि यामागील उद्देश काय होता, याचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध बाजूंनी तपास करत आहेत.


