चंद्रपूर प्रतिनिधी
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील प्रसिद्ध सातबहिणी डोंगरावर नवस फेडण्यासाठी आलेल्या एका कुटुंबावर मधमाश्यांनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तीन वर्षांच्या चिमुरडीसह एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चाचरकर कुटुंबातील सदस्य आपल्या मुलीचा नवस फेडण्यासाठी सातबहिणी डोंगरावरील मंदिरात गेले होते. पूजा विधी सुरू असतानाच परिसरातील मधमाश्यांच्या मोठ्या पोळ्यातील माश्या अचानक आक्रमक झाल्या आणि त्यांनी भाविकांवर हल्ला चढविला. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात काही काळ धावपळ उडाली.
या घटनेत विठ्ठल चाचरकर, नत्थू चाचरकर, कविता चाचरकर आणि सायली चाचरकर हे चौघे जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने गोविंदपूर व तळोधी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच तळोधी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने बचावकार्य राबवत जखमींना सुरक्षितपणे डोंगरावरून खाली आणले आणि उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.
दरम्यान, सातबहिणी डोंगर परिसरात मोठ्या प्रमाणावर मधमाश्यांची पोळी असल्याने भाविकांनी पूजा करताना धूर, उदबत्ती किंवा मोठा आवाज टाळावा, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा धुरामुळे मधमाश्या आक्रमक होण्याची शक्यता अधिक असल्याने डोंगरावर जाताना भाविकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.


