मुंबई प्रतिनिधी
पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम देशातील इंधनपुरवठ्यावर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्माण झालेल्या गॅसटंचाईच्या मुद्द्यावरून बुधवारी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. परराष्ट्र धोरणातील अपयशामुळे सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर परिणाम होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे आखाती प्रदेशातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. इराणने होमुर्झ सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाजवाहतुकीवर निर्बंध घातल्याची तसेच काही आखाती देशांनी तेल आणि गॅस उत्पादनात कपात केल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर भारतात गॅसपुरवठ्यावर परिणाम होत असून अनेक शहरांमध्ये घरगुती व व्यावसायिक गॅसचा तुटवडा जाणवू लागल्याचे विरोधकांनी निदर्शनास आणून दिले.
या परिस्थितीत घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सुमारे ६० रुपयांची वाढ झाली असून व्यावसायिक गॅस सिलिंडर सुमारे ११५ रुपयांनी महाग झाल्याचे सांगण्यात आले. तसेच गॅस बुकिंगसाठी आधी असलेली १५ दिवसांची मर्यादा वाढवून २५ दिवस करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय वाढल्याची टीकाही करण्यात आली.
गॅसपुरवठ्यातील अडचणींमुळे राज्यातील हॉटेल व्यवसायावरही परिणाम होत असल्याचा दावा विरोधकांनी केला. व्यावसायिक गॅसचा पुरवठा अपुरा असल्याने राज्यातील सुमारे ३० टक्के हॉटेल्स बंद ठेवावी लागली आहेत. पुढील काही दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः नोकरी, शिक्षण किंवा इतर कारणांमुळे परगावी राहणाऱ्या आणि खानावळी किंवा हॉटेलवर अवलंबून असलेल्या नागरिकांना याचा मोठा फटका बसू शकतो, असे विरोधकांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निदर्शने करत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. “फसले परराष्ट्र धोरण, सामान्य जनतेच्या नशिबी लाकूड आणि सरण”, “गॅस काढा, गॅस काढा”, “गटारीतून गॅस काढा”, तसेच “लाडक्या बहिणींना गॅसवर ठेवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो” अशा घोषणा देत त्यांनी सरकारचा निषेध नोंदविला.
दरम्यान, राज्यातील परिस्थितीबाबत सरकारने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. राज्यात घरगुती गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने सर्वसामान्य गृहिणींमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे विकासाच्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे नागरिकांना चूल कशी पेटवायची, याची चिंता भेडसावत असल्याचे ते म्हणाले.
विधानसभेचे कामकाज मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू असताना कँटीन बंद असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. बाहेरील अनेक हॉटेल्स गॅसअभावी बंद असल्याने अडचणी निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई आणि नागपूरसह काही शहरांमध्ये सुमारे ३० टक्के हॉटेल्स गॅस तुटवड्यामुळे बंद ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
गॅसटंचाईमुळे काळाबाजार वाढण्याची शक्यता असल्याचाही इशारा त्यांनी दिला. अलीकडेच एचपीसीच्या सुमारे १८ लाख रुपयांच्या गॅस सिलिंडरची गाडी चोरीला गेल्याची घटना घडल्याचे सांगत ही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. गॅस टंचाईच्या निषेधार्थ कोल्हापूर आणि विदर्भासह राज्यातील विविध भागांत आंदोलन सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, या संपूर्ण परिस्थितीबाबत सरकारने जनतेची दिशाभूल न करता वस्तुस्थिती स्पष्ट करावी आणि गॅसपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात आली.


