मुंबई प्रतिनिधी
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाचे पडसाद आता भारतातही उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने व्यावसायिक एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा थेट फटका मुंबई आणि नवी मुंबईतील हॉटेल उद्योगाला बसत आहे. गॅस उपलब्ध न झाल्यामुळे मुंबईतील सुमारे २० टक्के हॉटेल्स तात्पुरती बंद ठेवावी लागली असल्याची माहिती हॉटेल व्यावसायिकांच्या ‘आहार’ संघटनेने दिली आहे.
हॉटेल व्यवसाय मोठ्या प्रमाणावर कमर्शियल एलपीजी सिलेंडरवर अवलंबून असल्याने गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यास व्यवसाय थांबवण्याची वेळ येते. सध्या अनेक भागांत व्यावसायिक सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल चालक अडचणीत सापडले आहेत. परिणामी अनेकांनी काही काळासाठी हॉटेल्स बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नवी मुंबईतही परिस्थिती गंभीर
नवी मुंबईतील सानपाडा, तुर्भे, वाशी, नेरुळ आणि ऐरोली परिसरातही अनेक हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी येत आहेत. काही ठिकाणी गॅस वितरण केंद्रांबाहेर रांगा लागत असून, पुरवठा अनियमित असल्याने हॉटेल मालकांना पर्यायी व्यवस्था शोधावी लागत आहे.
नवी मुंबईतील अनेक लहान-मोठ्या खानावळी, उपाहारगृहे आणि स्ट्रीट-फूड विक्रेत्यांवर या परिस्थितीचा मोठा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी हॉटेल्सची वेळ मर्यादित ठेवण्यात आली आहे, तर काहींनी पूर्णपणे शटर खाली केले आहे.
तीन दिवसांत ५० टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
गॅस पुरवठा लवकर सुरळीत न झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. आहार संघटनेच्या मते, हा तुटवडा कायम राहिल्यास येत्या तीन दिवसांत मुंबई-नवी मुंबईतील सुमारे ५० टक्के हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता आहे. यामुळे हजारो कामगारांवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आर्थिक फटका आणि रोजगाराचा प्रश्न
हॉटेल उद्योग हा मुंबईच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक मानला जातो. शहरातील लाखो नागरिक रोजच्या आहारासाठी हॉटेल्स आणि खानावळींवर अवलंबून असतात. तसेच या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध आहे. गॅस तुटवड्यामुळे हॉटेल्स बंद राहिल्यास व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच कामगारांच्या रोजगारावरही संकट ओढवू शकते.
सरकारकडे धाव
‘आहार’चे अध्यक्ष विजय शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी संघटना केंद्र आणि राज्य सरकारशी सातत्याने संपर्कात आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेचे प्रतिनिधी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाशी संवाद साधत असून, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचीही मंगळवारी भेट घेऊन गॅस पुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी करणार आहेत.
दरम्यान, मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर परिणाम होत असल्याने परिस्थिती कशी विकसित होते याकडे हॉटेल उद्योगासह सामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे.


