मुंबई प्रतिनिधी
मार्चच्या दुसऱ्याच आठवड्यात राज्यात उन्हाचा तीव्र चटका जाणवू लागला असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. उष्णतेचा पारा चढल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दुपारच्या वेळेत बाहेर पडणे कठीण होत असून उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रासह राजस्थान आणि गुजरातमधील अनेक शहरांमध्ये तापमान ४० अंश सेल्सिअसच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. मंगळवारी (ता. १०) कोकण आणि विदर्भातील काही भागांत उष्णतेच्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांत उष्ण व दमट हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड तसेच विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा येथे उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. तर रत्नागिरी, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा अंदाज व्यक्त करत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मुंबईतही उष्णतेचा जोर वाढल्याचे चित्र आहे. सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३८.४ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले, तर कुलाबा येथे ३५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सलग दुसऱ्या आठवड्यात मुंबईतील कमाल तापमान ३८ अंशांच्या पुढे गेल्याने शहर आणि उपनगरांतील नागरिकांना उकाड्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, सध्या महाराष्ट्र आणि गुजरात परिसरावर उच्च दाबाची स्थिती सक्रिय असल्याने वातावरण कोरडे झाले आहे. त्यामुळे तापमानात लक्षणीय वाढ होत असून त्याचा परिणाम विशेषतः मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या भागांवर अधिक जाणवत आहे.
विदर्भात उष्णतेचा कडाका
विदर्भातील नागपूर, भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यांत तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. नागपूरमध्ये दुपारच्या सुमारास उष्णतेची तीव्रता जाणवत असून नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. भंडारा आणि बुलढाणा जिल्ह्यांतही तापमान ३८ ते ४० अंशांच्या दरम्यान नोंदवले जात असून उष्णतेचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही उकाडा
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतही उन्हाची तीव्रता वाढली आहे. पुण्यात कमाल तापमानात वाढ होत असून दुपारच्या वेळी उष्ण व कोरडे वातावरण जाणवत आहे. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत सकाळी हवामान तुलनेने सौम्य असले तरी दुपारनंतर उकाडा वाढत आहे. सोलापूरमध्ये मात्र उष्णतेचा प्रभाव अधिक जाणवत असून तापमान ३९ अंशांच्या जवळ पोहोचत आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत उष्णतेची ही तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे वापरणे आणि उन्हापासून संरक्षण घेणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.


