प्रतिनिधी |सुधाकर नाडर
मुंबई: एंटॉप हिल परिसरात एका २४ वर्षीय ‘मास्टर ऑफ डेंटल सर्जरी’ (MDS) विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी उघडकीस आली असून, घटनास्थळावरून इंग्रजीत लिहिलेली सहा पानांची सुसाइड नोट पोलिसांच्या हाती लागली आहे.
नवी मुंबईतील डेंटल कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी ही तरुणी आपल्या आई-वडील आणि बहिणीसह एंटॉप हिल येथे राहत होती; सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत ती खोलीबाहेर न आल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडला असता ती गळफास लावलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
सुसाइड नोटमध्ये तिने एका व्यक्तीला जबाबदार धरले असून त्यांच्यामध्ये असलेल्या प्रेमसंबंधांतून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी एंटॉप हिल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची (ADR) नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.


