अहमदाबाद :
भारतीय क्रिकेट संघाने टी-२० विश्वचषक २०२६ जिंकत इतिहास घडवला. न्यूझीलंडचा पराभव करत भारताने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. या विजयासह सलग दोन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे झालेल्या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघावर केवळ कौतुकाचा वर्षाव झाला नाही, तर बक्षीस रकमेचाही अक्षरशः पाऊस पडला.
The smiles say it all 😌
Vibe of champions 😎#TeamIndia | #T20WorldCup | #MenInBlue | #Final pic.twitter.com/F65Rn4Fi1E
— BCCI (@BCCI) March 8, 2026
यंदाच्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल(आयसीसी) ने विक्रमी बक्षीस रक्कम जाहीर केली होती. वाढत्या लोकप्रियतेच्या पार्श्वभूमीवर टी-२० विश्वचषकाची व्यावसायिक किंमतही मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे या बक्षीस रकमेवरून स्पष्ट होते. यावर्षीच्या स्पर्धेसाठी आयसीसीने एकूण सुमारे १२३.७७ कोटी रुपयांचा बक्षीस निधी ठेवला होता. विशेष म्हणजे २०२४ च्या स्पर्धेच्या तुलनेत ही रक्कम सुमारे २० टक्क्यांनी अधिक आहे.
विजेत्या भारताला २७.५० कोटी
अंतिम सामन्यातील शानदार कामगिरीमुळे भारतीय संघाला २७.५० कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले. तर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या न्यूझीलंडला १४.६७ कोटी रुपये देण्यात आले.
स्पर्धेतील उपांत्य फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या संघांनाही आयसीसीने उदार बक्षीस दिले. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना ७.२४ कोटी रुपये देण्यात आले.
इतर संघांनाही कोट्यवधींची रक्कम
स्पर्धेत पाचव्या ते बाराव्या क्रमांकावर राहिलेल्या संघांना प्रत्येकी सुमारे ३.४८ कोटी रुपये देण्यात आले. तर तेराव्या ते विसाव्या क्रमांकावर असलेल्या संघांना २.२९ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. त्यामुळे स्पर्धेत सहभागी सर्व संघांना आर्थिक लाभ मिळाला.
अहमदाबादमध्ये ‘बदला’ पूर्ण
विशेष म्हणजे ज्या मैदानावर तीन वर्षांपूर्वी भारताचे विश्वविजेते होण्याचे स्वप्न भंगले होते, त्याच मैदानावर भारतीय संघाने यावेळी इतिहास रचला. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय चाहत्यांमध्ये मोठी निराशा पसरली होती. मात्र याच मैदानावर यंदा भारताने न्यूझीलंडचा पराभव करत त्या पराभवाची जणू भरपाईच केली.
यजमान देश म्हणूनही नवा विक्रम
या विजयामुळे भारत घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला यजमान देश ठरला आहे. स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी प्रभावी कामगिरी करत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला. विशेषतः संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशांत किशन,अक्षर पटेल, आणि जसपित बुमरा यांनी निर्णायक क्षणी चमकदार कामगिरी करत संघाला विजेतेपदापर्यंत नेले.
भारतीय संघाच्या या ऐतिहासिक यशामुळे देशभरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून, क्रिकेटप्रेमींमध्ये अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.


