नवी दिल्ली: वृत्तसंस्था
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल शुक्रवारी (६ मार्च) जाहीर केला. यंदाच्या परीक्षेत अनुज अग्निहोत्री यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावत अव्वल स्थान मिळवले आहे. त्यांच्या पाठोपाठ राजेश्वरी सुवे एम यांनी दुसरा तर आकांश धुल्ल यांनी तिसरा क्रमांक मिळवला आहे. यंदाच्या निकालात पहिल्या दहामध्ये तीन मुलींनी स्थान मिळवत विशेष कामगिरी नोंदवली आहे.

देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि कठीण मानल्या जाणाऱ्या या नागरी सेवा परीक्षेतून आयएएस, आयपीएस, आयएफएस तसेच केंद्र सरकारच्या गट ‘अ’ आणि गट ‘ब’ सेवांसाठी अधिकाऱ्यांची निवड केली जाते. आयोगाने यंदा एकूण ९५८ उमेदवारांची विविध केंद्रीय सेवांसाठी शिफारस केली आहे.
दोन टप्प्यांतील कठोर प्रक्रिया
यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची लेखी (मुख्य) परीक्षा ऑगस्ट २०२५ मध्ये घेण्यात आली होती. त्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडल्या. लेखी परीक्षा आणि व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) या दोन्ही टप्प्यांतील गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.
दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी अर्ज करतात. मात्र कठोर निवड प्रक्रियेमुळे अंतिम यादीत केवळ काहीशे उमेदवारांनाच स्थान मिळते. त्यामुळे नागरी सेवा परीक्षा ही देशातील सर्वात स्पर्धात्मक आणि प्रतिष्ठेची परीक्षा म्हणून ओळखली जाते.
पहिल्या दहामध्ये तीन मुली
यंदाच्या निकालात राजेश्वरी सुवे एम (AIR 2), झिनिया अरोरा (AIR 6) आणि आस्था जैन (AIR 9) या तीन मुलींनी पहिल्या दहामध्ये स्थान मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महिला उमेदवारांची वाढती उपस्थिती ही नागरी सेवांमध्ये महिलांचा वाढता सहभाग दर्शवणारी बाब मानली जात आहे.
प्रवर्गनिहाय निवड
आयोगाने दिलेल्या माहितीनुसार निवड झालेल्या उमेदवारांचे प्रवर्गनिहाय वितरण पुढीलप्रमाणे आहे –
• सामान्य प्रवर्ग : ३१७
• आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) : १०४
• इतर मागासवर्ग (OBC) : ३०६
• अनुसूचित जाती (SC) : १५८
• अनुसूचित जमाती (ST) : ७३
टॉप १० उमेदवारांची यादी
१. अनुज अग्निहोत्री
२. राजेश्वरी सुवे एम
३. आकांश धुल्ल
४. राघव झुनझुनवाला
५. ईशान भटनागर
६. झिनिया अरोरा
७. ए. आर. रजाह मोहैदीन
८. पक्षाल सेक्रेटरी
९. आस्था जैन
१०. उज्ज्वल प्रियंक
निवड झालेल्या उमेदवारांना भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय पोलीस सेवा (IPS), भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) तसेच केंद्र सरकारच्या विविध गट ‘अ’ आणि ‘ब’ सेवांमध्ये नियुक्ती मिळणार आहे. देशाच्या प्रशासन व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणारे अधिकारी याच परीक्षेतून निवडले जात असल्याने या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते.


