अहिल्यानगर प्रतिनिधी
जामखेड शहरात गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली. कुख्यात गुंड सागर मोहोळकर याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी सलग सहा गोळ्या झाडल्या. त्यापैकी पाच गोळ्या लागल्याने मोहोळकर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास जामखेड येथील नुराणी कॉलनी परिसरात घडली. सागर मोहोळकर हा परिसरातून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तींनी त्याच्यावर अचानक गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून तात्काळ पलायन केले.
प्राथमिक माहितीनुसार मोहोळकरला तोंडावर दोन, डोळ्याजवळ एक आणि छातीवर दोन अशा पाच गोळ्या लागल्या आहेत. घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांच्या मदतीने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या घटनेनंतर जामखेड शहरासह अहिल्यानगर, पुणे, सोलापूर आणि बीड जिल्ह्यात पोलिसांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
दरम्यान, सागर मोहोळकर हा गेल्या वर्षी पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ याला कानशिलात लगावल्याच्या घटनेमुळे चर्चेत आला होता. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंदरुड गावातील यात्रेदरम्यान ११ एप्रिल २०२५ रोजी हा प्रकार घडला होता.
मोहोळकर याची गुन्हेगारी पार्श्वभूमीही गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्यावर खुनासह विविध गुन्हे दाखल असून, तुरुंगात असताना देखील एका व्यक्तीच्या हत्येचा आरोप त्याच्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. जुन्या वैमनस्यातूनच हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


