मुंबई प्रतिनिधी
अजित पवार गटातील बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून महत्त्वाचे दावे पुढे आले आहेत. हत्येमागे ‘बिल्डर लॉबी’ असल्याचा आरोप फेटाळत, राज्यात दहशत निर्माण करणे आणि खंडणीसाठी वर्चस्व प्रस्थापित करणे हा बिश्नोई टोळीचा उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
न्यायालयात पोलिसांचा ठाम दावा
१२ ऑक्टोबर २०२४ रोजी दसऱ्याच्या रात्री वांद्रे (पूर्व) येथे माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेने मुंबईसह राज्यात मोठी खळबळ उडाली होती. सुरुवातीपासूनच या गुन्ह्यामागे बिश्नोई टोळी असल्याची शक्यता वर्तवली जात होती.
उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सहाय्यक पोलिस आयुक्त किशोरकुमार शिंदे यांनी तपासादरम्यान कोणत्याही बिल्डर किंवा विकासकाचा या हत्येशी संबंध आढळून न आल्याचे नमूद केले आहे. झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प (SRA) संदर्भातील वादातून हा गुन्हा घडल्याचा आरोपही पोलिसांनी फेटाळला.
‘बिल्डर लॉबी’चा आरोप तथ्यहीन
सिद्दीकी यांच्या पत्नी शहझीन सिद्दीकी यांनी तपास अपूर्ण असल्याचा दावा करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वांद्रे ते अंधेरी दरम्यानच्या पुनर्विकास प्रकल्पांत रस असलेल्या काही प्रभावशाली बिल्डरांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
मात्र, पोलिसांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात हे आरोप ‘तथ्यहीन’ असल्याचे म्हटले आहे. तपास यंत्रणेची प्रतिमा मलिन करण्यासाठी व अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी असे आरोप करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
दहशत व खंडणी हा मुख्य उद्देश
प्रतिज्ञापत्रानुसार, अनमोल बिश्नोईच्या टोळीने महाराष्ट्रात आपला प्रभाव वाढवण्यासाठी आणि गुन्हेगारी विश्वात वर्चस्व निर्माण करण्यासाठी ही हत्या केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दहशत निर्माण करणे आणि खंडणी गोळा करणे हा या गुन्ह्यामागील प्रमुख हेतू असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
या प्रतिज्ञापत्रामुळे हत्येमागील कारणांबाबत सुरू असलेल्या चर्चांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तथापि, न्यायालयीन प्रक्रियेत पुढील सुनावणीदरम्यान या दाव्यांची कसून छाननी होणार आहे.


