बेळगाव प्रतिनिधी
बारावीच्या सार्वजनिक परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षेला जाण्याच्या तयारीत असताना १७ वर्षीय विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चिक्कोडी तालुक्यातील बंबलवाड येथे शनिवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी घडली. भूमिका माळंगी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
चिक्कोडी तालुक्यातील चिंचणी येथील सिद्धप्रभू पदवीपूर्व महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेली भूमिका ही अभ्यासू व शांत स्वभावाची विद्यार्थिनी म्हणून ओळखली जात होती. शनिवारी बारावी परीक्षेचा पहिला पेपर असल्याने ती सकाळी लवकर उठून अभ्यास करत होती.
अंघोळ करून परीक्षा केंद्रासाठी तयार होत असतानाच तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले व क्षणातच ती कोसळली. कुटुंबीयांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला; मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराचा तीव्र झटका हे मृत्यूचे कारण असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच महाविद्यालयाचे शिक्षक, वर्गमैत्रिणी व ग्रामस्थांनी माळंगी कुटुंबीयांच्या घरी धाव घेतली. परीक्षेच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये व गावात शोककळा पसरली आहे. सिद्धप्रभू पदवीपूर्व महाविद्यालय प्रशासनाने शोकसंदेश प्रसिद्ध करून भूमिकाच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या.
हसतमुख व अभ्यासात प्रावीण्य मिळविण्याची धडपड असलेल्या विद्यार्थिनीचे असे अकाली निधन झाल्याने ‘हातात पेन घेण्यापूर्वीच नियतीने झडप घातली’, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.


