स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई: आपल्या कार्यतत्परतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा गुन्हेगारी जगताला जोरदार दणका दिला आहे. कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाचा वापर करून एका सराफा व्यापाऱ्याकडे ३० लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीचा बोरीवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अत्यंत धाडसी आणि नियोजनबद्धरीत्या ‘ट्रॅप’ लावून पोलिसांनी या टोळीतील चार सदस्यांना अटक केली असून, त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नेमकी घटना काय?
बोरीवली परिसरातील एका सराफा व्यापाऱ्याला १८ ते २४ फेब्रुवारी दरम्यान व्हॉट्सॲप कॉल्स आणि मेसेजद्वारे धमकावण्यात येत होते. “आम्ही लॉरेन्स बिश्नोई टोळीतून बोलत आहोत, ३० लाख रुपये दे नाहीतर जीवे मारू,” अशी धमकी या गुंडांनी दिली होती. या प्रकारामुळे व्यापारी सुरुवातीला घाबरला होता, मात्र त्याने बोरीवली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.
पोलिसांचा मास्टरप्लॅन आणि ‘फिल्मी’ स्टाईल सापळा
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) मिलिंद नागपुरे यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक तपासाद्वारे आरोपींचा माग काढणे कठीण असताना, पोलिसांनी व्यापाऱ्याला विश्वासात घेऊन एक योजना आखली.
आरोपींना सांगण्यात आले की, बँकेतून एवढी मोठी रक्कम देणे शक्य नाही, त्याऐवजी तुम्ही सोन्याच्या नाण्यांच्या स्वरूपात पैसे घेऊन जा. या आमिषाला आरोपी बळी पडले. माहिम पश्चिम परिसरात सोन्याची नाणी घेण्यासाठी आलेल्या रियाजुद्दीन मोहम्मद बशीर (२९) याला पोलिसांनी दबा धरून पकडले. त्याची कसून चौकशी केल्यावर या रॅकेटमधील अन्य दुवे समोर आले.
झारखंड कनेक्शन उघड
एका आरोपीला अटक केल्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा वांद्रे आणि जोगेश्वरीकडे वळवला. तिथून पोलिसांनी मोहम्मद फैय्याज ऊर्फ सद्दाम (२७), मोहम्मद अश्रफूल कादरी (३६) आणि मोहम्मद आरबाज अन्सारी (२७) यांना अटक केली. विशेष म्हणजे, हे सर्व आरोपी झारखंडमधील वासेपूर (जि. धनबाद) येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल जप्त करण्यात आले असून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.
या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात यशस्वी कामगिरी
मुंबई पोलिसांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अप्पर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना, उपायुक्त संदीप जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुसूदन नाईक यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
“कुख्यात टोळ्यांच्या नावाचा वापर करून सामान्य नागरिकांना किंवा व्यापाऱ्यांना घाबरवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. मुंबई पोलीस अशा गुन्हेगारांचा नायनाट करण्यासाठी सदैव सज्ज आहेत,” असा स्पष्ट संदेश या कारवाईतून पोलिसांनी दिला आहे.


