स्वप्नील गाडे| रिपोर्टर
चेंबूर : बहिणीची बदनामी करत असल्याच्या संशयातून एका ३१ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना चेंबूरच्या आरसीएफ परिसरात घडली आहे. रोहित ऊर्फ छोटू राजनाथ विश्वकर्मा असे मृताचे नाव असून, या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी प्रदीप गौडा या आरोपीला अटक केली आहे. जुन्या वैमनस्यातून आणि संशयातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
नेमकी घटना काय?
मयत रोहित हा चेंबूर परिसरात आपली आई अमलादेवी आणि भावंडांसोबत राहत होता. तो आपला भाऊ अनिलसोबत वेल्डिंगचे काम करून कुटुंबाला हातभार लावत असे. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी रोहित कामासाठी घराबाहेर पडला होता. रात्री साडेदहाच्या सुमारास त्याने भावाला फोन करून ‘थोड्या वेळात घरी येतो’ असे सांगितले. मात्र, रात्री सव्वाअकराच्या सुमारास रामटेकडी गार्डनजवळ आरोपी प्रदीप गौडा याने रोहितला गाठले. दोघांमध्ये पुन्हा जुन्या कारणावरून वाद झाला आणि याचे पर्यावसान हिंसेत झाले.
रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू
वादादरम्यान आरोपी प्रदीपने रागाच्या भरात रोहितच्या छातीत चाकूने खोलवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहितला तातडीने सायन रुग्णालयात हलवण्यात आले. तेथील अतिदक्षता विभागात (ICU) त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र जखम खोल असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अनिल विश्वकर्मा यांच्या तक्रारीवरून आरसीएफ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
वैर सहा महिन्यांपूर्वीच्या वादातून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीपला तीन बहिणी आहेत. सुमारे सहा महिन्यांपूर्वी रोहितने प्रदीपला त्याच्या एका बहिणीच्या वर्तणुकीबाबत आणि ती कोणासोबत फिरते, याबद्दल माहिती दिली होती. तेव्हापासून प्रदीप रोहितवर चिडून होता. रोहित आपल्या मित्रांमध्ये मिळून बहिणीची बदनामी करतो, असा संशय प्रदीपला होता. यापूर्वीही प्रदीपने रोहितला गाठून मारहाण केली होती आणि ‘पुन्हा बहिणीबद्दल काही बोलल्यास जिवे मारेन’ अशी धमकी दिली होती. याच रागातून शनिवारी रात्री त्याने रोहितचा काटा काढला.
आरसीएफ पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून आरोपी प्रदीप गौडाला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


