स्वप्नील गाडे| रिपोर्टर
मुंबई | मुंबईत बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या परकीय नागरिकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम तीव्र केली आहे. अंधेरीतील वर्सोवा परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात २५ बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, यामध्ये २१ ट्रान्सजेंडर व्यक्तींचा समावेश असून, गेल्या अनेक वर्षांपासून हे सर्वजण कोणतीही वैध कागदपत्रे नसताना मुंबईत राहत असल्याचे उघड झाले आहे.
वर्सोवा येथील शाकुलशहा दर्गा परिसरात काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या राहत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या भागात धडक मोहीम राबवून संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे पासपोर्ट, व्हिसा किंवा वास्तव्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती. प्राथमिक चौकशीत हे सर्वजण मूळचे बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले.
कोलकाता, मिझोराममार्गे प्रवेश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घुसखोरांनी भारत-बांगलादेश सीमेवरून कोलकाता आणि मिझोराम मार्गे भारतात प्रवेश केला होता. त्यानंतर ते मुंबईत आले आणि शहरातील विविध भागांत उदरनिर्वाह करत होते. या टोळीला कोणाचे पाठबळ मिळत आहे आणि त्यांना सीमा ओलांडण्यास कोणी मदत केली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून बेकायदेशीर घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या ताज्या कारवाईमुळे महानगराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामागे मोठे रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
‘परकीय नागरिक कायद्या’नुसार गुन्हा
अटक करण्यात आलेल्या २५ जणांविरुद्ध ‘परकीय नागरिक कायद्या’च्या (Foreigners Act) विविध कलमान्वये वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घुसखोरीच्या साखळीत कोणते एजंट सक्रिय आहेत, तसेच त्यांना भारतात रेशन कार्ड किंवा आधार कार्ड सारखी कागदपत्रे मिळवून देण्यात कोणाचा हात आहे का, याचा कसून तपास पोलीस करत आहेत.


