मुंबई प्रतिनिधी
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास अखेर सुरुवात झाली असून, गेल्या काही आठवड्यांपासून निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभीच महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याने लाभार्थींमध्ये दिलासा व्यक्त होत आहे.
जानेवारीनंतर फेब्रुवारी महिना संपत आला तरी हप्ता न मिळाल्याने राज्यभरातील लाभार्थी महिलांमध्ये नाराजीची भावना होती. दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र दिले जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच प्रत्यक्षात जानेवारी महिन्याची रक्कम टप्प्याटप्प्याने वर्ग करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले. सोमवारी सायंकाळपासून अनेक महिलांच्या बँक खात्यात १५०० रुपये जमा झाल्याच्या नोंदी समोर आल्या आहेत.
राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या या योजनेत पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने रक्कम दिली जाते. तथापि, अलीकडील ई-केवायसी पडताळणी प्रक्रियेमुळे काही लाभार्थींचे हप्ते प्रलंबित राहिले होते. प्रशासनाच्या माहितीनुसार, ज्या महिलांनी आवश्यक ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांनाच जानेवारीचा हप्ता जमा होत आहे.
ई-केवायसीतील त्रुटी किंवा अपूर्ण पडताळणीमुळे मागील महिन्याचा लाभ न मिळालेल्या महिलांना सध्या हप्ता मिळालेला नाही. अशा लाभार्थींना पडताळणी पूर्ण झाल्यानंतर रखडलेली रक्कम एकत्रित स्वरूपात देण्यात येईल, असेही संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. ई-केवायसीची मुदत संपलेली असली तरी त्रुटी दुरुस्तीसाठी पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हप्ता जमा होण्यास सुरुवात झाल्याने योजनेच्या अंमलबजावणीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांना काही प्रमाणात विराम मिळाला आहे. उर्वरित लाभार्थींच्या खात्यातही येत्या काही दिवसांत रक्कम जमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


