मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील वरळी डोम येथे मंगळवारी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित शोकसभा अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडली. २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत त्यांच्या अकाली निधनानंतर राज्यातील सर्वपक्षीय राजकीय नेतृत्व, प्रशासकीय अधिकारी, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो कार्यकर्ते एकत्र येत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
शोकसभेला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, माजी सरन्यायाधीश भूषण गवई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे, प्रफुल पटेल, मंत्री छगन भुजबळ, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार जयंत पाटील, तसेच पवार कुटुंबीय, त्यांचे पुत्र पार्थ व जय पवार आणि विविध पक्षांचे नेते-कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘जनतेचा नेता’ हरपला – फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रद्धांजलीपर भाषणात सांगितले की, “ही वेळ येईल, असे कधी वाटले नव्हते. महाराष्ट्राच्या जडणघडणीत अजितदादांचा मोठा वाटा आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील घडामोडींवर त्यांची अचूक पकड होती. त्यांनी ‘जनतेचा नेता’ अशी प्रतिमा निर्माण केली.”
‘काळाचा संकेत ओळखता आला नाही’ – शिंदे
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “१९९१ पासून त्यांनी विविध महत्त्वाची पदे भूषविली. आमचे परस्परांतील समन्वय आणि विश्वास दृढ होता; मात्र काळाचा संकेत आम्हाला ओळखता आला नाही, ही खंत कायम राहील.”
‘महाराष्ट्रासाठी मोठा आघात’ – गडकरी
केंद्रीय मंत्री गडकरी यांनी सांगितले, “विधिमंडळातील सहवासातून आमची घट्ट मैत्री झाली. जनतेच्या हिताची कोणतीही बाब त्यांनी ठामपणे मांडली. त्यांचे अकाली जाणे हा महाराष्ट्रासाठी मोठा आघात आहे.”
‘हीच खरी श्रद्धांजली’ – पटेल
प्रफुल पटेल म्हणाले, “दादांच्या शोकसभेला अशा प्रकारे एकत्र यावे लागेल, असे कधी वाटले नव्हते. देशभरातून व्यक्त झालेला जनभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची उंची दर्शवितो. इतक्या मोठ्या संख्येने जमलेली ही उपस्थितीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे.”
‘अवेळी निघून गेले’ – भुजबळ
छगन भुजबळ भावुक होत म्हणाले, “आयुष्यात अनेक शोकसभांना गेलो; पण दादांच्या शोकसभेला उपस्थित राहावे लागेल, असे कधी वाटले नव्हते. प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचणारे दादा आज मात्र अवेळी निघून गेले.”
गीताच्या ओळींतून श्रद्धांजली – जयंत पाटील
जयंत पाटील यांनी “चिठ्ठी ना कोई संदेश…” या गीताच्या ओळींनी दादांची आठवण जागवली. “सकाळी सहापासून रात्री दहापर्यंत कार्यरत राहणारा नेता दुर्मिळ. विकासकामे पाहायची असतील, तर बारामतीला जावे,” असे ते म्हणाले. शेवटी “इक आह भरी होगी… जाते जाते तुमने, आवाज़ तो दी होगी…” या ओळींनी सभागृहात क्षणभर स्तब्धता पसरली.
‘पंच्याहत्तराव्या वाढदिवसाला जमलो असतो तर…’ – नाना पाटेकर
अभिनेते नाना पाटेकर यांनी सांगितले, “गेल्या पन्नास वर्षांपासून आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते. हीच मंडळी त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त जमली असती, तर अधिक समाधान वाटले असते,” असे म्हणत त्यांना अश्रू अनावर झाले.
अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी शोकसभेत प्रत्येक वक्त्याच्या शब्दांत प्रकर्षाने जाणवत होती. सर्वपक्षीय उपस्थितीत पार पडलेली ही सभा त्यांच्या कार्याला वाहिलेली सामूहिक आदरांजली ठरली.


