मुंबई प्रतिनिधी
मुंबईकरांसाठी कोकण प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि वाहतूक कोंडीपासून मुक्त करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग दरम्यान ‘एम2एम प्रिन्सेस’ या रो-रो फेरी सेवेला अखेर अंतिम रूप मिळाले असून १ मार्चपासून ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याची तयारी महाराष्ट्र मॅरीटाइम बोर्डाने पूर्ण केली आहे. प्रायोगिक चाचणी यशस्वी झाल्यास एप्रिल २०२६ पासून नियमित सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई–विजयदुर्ग दरम्यान सध्या रस्तेमार्गे सुमारे ४१२ किमी अंतर पार करण्यासाठी ९ ते १० तास लागतात, तर रेल्वेने १० ते १२ तासांचा कालावधी लागतो. सुट्ट्यांच्या हंगामात आणि सणासुदीला हा वेळ आणखी वाढतो. नव्या समुद्रमार्गामुळे हा प्रवास अवघ्या ७ तासांत पूर्ण होणार असल्याने वेळेत ५–६ तासांची बचत अपेक्षित आहे. त्यामुळे कोकण पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
ही सेवा मुंबईतील भाऊचा धक्का येथून सुरू होऊन विजयदुर्ग बंदरात पोहोचेल. रो-रो जेटीमुळे प्रवाशांना दुचाकी, चारचाकी तसेच बससह प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे खासगी वाहनांसह थेट कोकणात जाणे शक्य होईल.
मार्च महिन्यातील प्रायोगिक फेऱ्या
मुंबई–विजयदुर्ग: १, ४, ७, ११, १४, १८, २१, २५ मार्च
विजयदुर्ग–मुंबई: २, ५, ८, १२, १५, १९, २२, २६ मार्च
वेळापत्रक
मुंबईहून सकाळी ८ वाजता सुटणारी फेरी दुपारी ३ वाजता विजयदुर्ग येथे पोहोचेल. परतीची फेरी विजयदुर्गहून दुपारी १२ वाजता सुटून सायंकाळी ७ वाजता मुंबईत येईल. प्रत्येक प्रवास सुमारे ७ तासांचा असेल.
प्रस्तावित भाडे संरचना
• इकॉनॉमी : ₹२,५००
• प्रिमियम इकॉनॉमी : ₹४,०००
• बिझनेस क्लास : ₹७,५००
• फर्स्ट क्लास : ₹९,०००
• बाईक : ₹१,०००
• सायकल : ₹६००
• चारचाकी : ₹६,०००
• बस : ₹१३,००० ते ₹२१,०००
ऑगस्ट २०२५ मध्ये या समुद्री मार्गाची घोषणा करण्यात आली होती; मात्र तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रियांमुळे विलंब झाला. आता निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मार्चअखेर प्रकल्प कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई–कोकण समुद्री प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार असल्याने प्रवासी आणि पर्यटन क्षेत्राकडून समाधान व्यक्त केले जात आहे.


