मुंबई : प्रतिनिधी
देशातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था असलेल्या आयआयटी (IIT) मुंबईच्या पवई संकुलात पाच जिवंत काडतुसे सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या पैशांच्या वादातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी पवई पोलिसांनी सर्वोत्तम आनंद सतीशचंद्र चौधरी (२३) या विद्यार्थ्याला अटक केली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे बिहारमधील अवैध शस्त्रास्त्रांच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेल्या ‘मुंगेर’शी जोडले गेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृह क्रमांक १ च्या तळमजल्यावर सूरज दुबे आणि अमन या दोन विद्यार्थ्यांमध्ये पैशांच्या व्यवहारावरून जोरदार वाद सुरू होता. या वादाची कुणकुण लागताच सुरक्षा रक्षकांनी तेथे धाव घेतली. सुरक्षा पथकाने संशयावरून सूरज दुबे आणि अपूर्व मिश्रा यांच्या खोल्यांची झडती घेतली असता, तिथे मद्यप्राशन केल्याचे आढळून आले. मात्र, अधिक तपासणी केली असता सूरजच्या खोलीत एका काळ्या बॅगेत ‘KF ७.६५’ असा शिक्का असलेली पाच जिवंत काडतुसे सापडली.
पोलिसी चौकशीत ही काडतुसे सर्वोत्तम चौधरी या विद्यार्थ्याची असल्याचे समोर आले. सर्वोत्तम हा मूळचा बिहारमधील समस्तीपूरचा रहिवासी असून, त्याने ही काडतुसे मुंगेर येथून खरेदी केल्याची कबुली दिली आहे. मुंगेर हे अवैध शस्त्रास्त्र निर्मितीचे केंद्र मानले जाते, त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. पवई पोलिसांनी सर्वोत्तमविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
आरोपीच्या मोबाईलमधील संपर्क आणि संदेशांची पडताळणी केली जात असून, त्याने यापूर्वी कोणाला काडतुसे पुरवली होती का आणि त्याचा खरा हेतू काय होता, याचा तपास सुरू आहे. आयआयटीसारख्या संवेदनशील आणि प्रतिष्ठित संस्थेच्या आवारात थेट जिवंत काडतुसे सापडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि कॅम्पस सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


