सोलापूर प्रतिनिधी
इयत्ता दहावीच्या परीक्षांचा ताण आणि घरातील दुःखाचा डोंगर – या दुहेरी संकटाला सामोरे जात सोलापूर जिल्ह्यातील एका विद्यार्थिनीने दाखवलेले धैर्य आणि शिक्षणाविषयीची निष्ठा मन हेलावून टाकणारी ठरली आहे. वडिलांचे पार्थिव घरात असतानाही परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतलेल्या धनश्री भिकाजी पवार हिच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
धनश्रीचे वडील भिकाजी पवार यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. कुटुंबावर शोककळा पसरली. याच दिवशी धनश्रीचा दहावीचा पहिला पेपर होता. मुलीचा पेपर बुडू नये आणि तिच्या शिक्षणाविषयीचे वडिलांचे स्वप्न अपूर्ण राहू नये, या भावनेतून शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांनी पुढाकार घेतला.
माने स्वतः धनश्रीच्या घरी गेले. नातेवाईकांशी चर्चा करून अंत्यविधी दोन तासांनी पुढे ढकलण्याची विनंती त्यांनी मान्य करून घेतली. दुःखात खचलेल्या विद्यार्थिनीला धीर देत त्यांनी तिला परीक्षेसाठी तयार केले आणि स्वतः परीक्षा केंद्रावर नेले. परिस्थितीची माहिती शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना देण्यात आली. जगताप यांनीही केंद्रावर येऊन विद्यार्थिनीला मानसिक आधार दिला.
मानसिक स्थिती लक्षात घेता धनश्रीला पूर्ण वेळ बसणे शक्य नव्हते. तरीही तिने दीड तास एकाग्रतेने पेपर लिहिला. त्यानंतर मुख्याध्यापक माने यांनी शाळेचे सेवक संतोष लोंढे यांच्या वाहनातून तिला अंत्यविधीसाठी घरी पोहोचवले.
वडिलांच्या निधनाच्या आघातातही शिक्षणाला प्राधान्य देण्याचा धनश्रीचा निर्णय आणि शिक्षक-प्रशासनाने दाखवलेली संवेदनशीलता यामुळे उपस्थित नातेवाईक तसेच शाळा प्रशासनाच्या डोळ्यांत अश्रू तरळले. संकटावर मात करून शिक्षणाचा ध्यास कायम ठेवणाऱ्या धनश्रीच्या धैर्याचा सर्व स्तरांतून गौरव होत असून, ती वडिलांचे स्वप्न नक्की पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


