सोलापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानानंतर पुणे–सोलापूर महामार्गावर मोहोळ शहराजवळील एका हॉटेलबाहेर ईव्हीएम मशिन्स आढळून आल्याने खळबळ उडाली. मात्र या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झालेला नसून संबंधित ईव्हीएम मशिन्स या राखीव (अतिरिक्त) असल्याचा खुलासा निवडणूक प्रशासनाने केला आहे. या घटनेप्रकरणी झोनल अधिकारी, त्यांचे सहाय्यक आणि वाहनचालक यांना दोषी धरत चौकशी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी दिली.
मोहोळ शहराजवळील स्वराज्य ढाब्याच्या बाहेर रात्रीच्या सुमारास काही ईव्हीएम मशिन्स ठेवण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिस प्रशासन व निवडणूक अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. या मशिन्स मोहोळ तालुक्यातील कुरुल जिल्हा परिषद गटातील असल्याचा दावा पाटील यांनी केला होता. त्यामुळे मतदानानंतर ईव्हीएम खासगी ठिकाणी कशा आढळल्या, याबाबत संशय व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, प्रशासनाकडून स्पष्टीकरण देताना उपजिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले की, संबंधित ईव्हीएम मशिन्सवर कोणतेही मतदान झालेले नाही. या मशिन्स राखीव स्वरूपातील होत्या. झोनल अधिकाऱ्यांकडे पर्यायी वापरासाठी अशा अतिरिक्त मशिन्स दिलेल्या असतात. मात्र संबंधित अधिकारी, त्यांचे सहकारी आणि वाहनचालक यांच्यातील समन्वयाअभावी हा प्रकार घडला. गाडी थांबवून सर्वजण जेवणासाठी उतरले असताना वाहनचालकाला सर्व ईव्हीएम उतरवण्यात आल्याचा गैरसमज झाला आणि मशिन्स गाडीतच राहिल्या. ही बाब अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर ती तत्काळ प्रशासनाला कळविण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर यांनीही या घटनेला दुजोरा दिला. त्यांनी स्पष्ट केले की, मतदान झालेल्या सर्व ईव्हीएम मशिन्स सुरक्षितरीत्या स्ट्रॉगरूममध्ये जमा करण्यात आल्या असून हॉटेलबाहेर आढळलेल्या मशिन्स या पूर्णपणे राखीव होत्या. यासंदर्भातील सविस्तर अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेला गांभीर्याने घेत प्रशासनाने पंचनामा करून चौकशी सुरू केली आहे. ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे सांगत संबंधित तिघांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
शनिवारी सोलापूर जिल्हा परिषदेच्या ६८ व पंचायत समितीच्या १३६ जागांसाठी सुमारे ६६ टक्के मतदान झाले आहे. निकालाबाबत उत्सुकता असतानाच ही घटना घडल्याने काही काळ संभ्रम निर्माण झाला होता. मात्र प्रशासनाच्या स्पष्टीकरणानंतर ईव्हीएम गैरप्रकाराचे आरोप निराधार ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.


