सोलापूर प्रतिनिधी
शहरातील एका व्यावसायिक दाम्पत्याने एकत्र विष प्राशन करून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर तपासात नवे धागेदोरे समोर आले आहेत. पत्नीवर एकतर्फी प्रेम करणाऱ्या व्यक्तीकडून सुरू असलेला छळ, वारंवार धमक्या आणि समाजात बदनामीची भीती या कारणांमुळे या दाम्पत्याने टोकाचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोमनाथ धानोप्पा पाटील (वय अंदाजे ३५) आणि श्रीदेवी सोमनाथ पाटील (वय अंदाजे ३०) अशी मृतांची नावे असून ते सोलापुरातील एमआयडीसी परिसरात वास्तव्यास होते. किरकोळ किराणा व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या दाम्पत्याला दोन लहान मुले आहेत. शुक्रवारी दुपारी दोघांनीही घरातच विषारी द्रव्य प्राशन केले. तोंडातून फेस येत असल्याचे लक्षात येताच मुलांनी नातेवाईकांना कळविले; मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीत विजयपूर येथील अभिषेक कोरे याचे नाव स्पष्टपणे नमूद असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित व्यक्ती श्रीदेवी पाटील यांच्यावर एकतर्फी प्रेम करत असून त्यातून तो वारंवार फोन, भेटीगाठी आणि धमक्यांद्वारे त्रास देत होता. दाम्पत्याला बदनाम करण्याचीही धमकी दिल्याचा उल्लेख चिठ्ठीत आहे. या सततच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.
चिठ्ठीतील मजकुराच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी अभिषेक कोरे याला विजयपूर येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षकांनी दिली.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून दोन चिमुकल्यांचे पालकत्व हिरावले गेल्याने शोककळा पसरली आहे.


