पुणे, प्रतिनिधी
भिगवण (ता. इंदापूर) येथे कथित अपहरण प्रकरणात दोन दिवसांपासून रंगत आलेल्या नाट्यमय घडामोडींना शुक्रवारी मध्यरात्री मोठी कलाटणी मिळाली. अपहरण झाल्याचा दावा करण्यात आलेली तरुणी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाली असून तिने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात “मीच जहीर शेखला बोलावून घेतले व त्याच्यासोबत राजीखुशीने निघून गेले,” असा स्पष्ट दावा केला आहे. आई-भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून पळवून नेल्याचा आरोपही तिने फेटाळला आहे.
कुटुंबीयांचा विरोध, लग्नाचा ताण
भिगवणमधील क्षीरसागर महाविद्यालयात टी.वाय.बी.ए. शिकणाऱ्या या तरुणीचे शेजारी राहणाऱ्या जहीर हारून शेख याच्याशी वर्षभरापासून प्रेमसंबंध असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. या संबंधांना कुटुंबीयांचा विरोध होता. कुटुंबीयांनी तिचे लग्न रावणगाव येथील नातेवाईक तरुणाशी २२ फेब्रुवारी रोजी ठरवले होते. “हे मला मान्य नव्हते. मी वारंवार सांगूनही दुर्लक्ष झाले,” असा आरोप तरुणीने केला आहे.
बाजारपेठेतून नियोजनबद्ध निघाल्याचा दावा
१७ फेब्रुवारी रोजी आई व भावासोबत बाजारात जाणार असल्याची माहिती देत तिने जहीरला भिगवण येथील रेस्टहाऊसजवळ थांबण्यास सांगितले. “आई-भावाची नजर चुकवून मी स्वतः टेम्पोमध्ये बसले व नगरच्या दिशेने निघाले,” असे तिने नमूद केले. मार्गातच तिने भावाला फोन करून “मी जहीरसोबत जात आहे,” अशी माहिती दिल्याचाही उल्लेख आहे.
‘मिरचीपूड’ कथन खोटे, फिर्यादीवर प्रश्न
आईने दिलेल्या तक्रारीत जहीर व त्याचा भाऊ आयान यांनी दांडक्याने धमकावत आई-भावाच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून तरुणीचे अपहरण केल्याचा आरोप होता. मात्र “अशी कोणतीही घटना घडलेली नाही. मी माझ्या इच्छेनेच निघून गेले,” असे तरुणीने स्पष्ट केले. कुटुंबीयांवर “कोणाच्या तरी दबावाखाली खोटी फिर्याद” दिल्याचाही आरोप तिने केला आहे.
नगर–हडपसर–सासवडमार्गे फिरस्ती
प्रतिज्ञापत्रानुसार दोघे नगर बायपासमार्गे परत पुण्याकडे आले. हडपसर, सासवड मार्गे ते साताऱ्यातील वाठार येथे थांबले. दुसऱ्या दिवशी परत येण्याच्या तयारीत असताना सोशल मीडियातून अपहरण प्रकरणाची बातमी कळल्याचे तिने म्हटले आहे.
राजकीय प्रतिक्रिया आणि मोर्चा
दरम्यान, प्रकरण उघड झाल्यानंतर “हिंदू तरुणीला दिवसाढवळ्या पळवून नेले” असा आरोप करत गोपीचंद पडळकर व संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली ‘हिंदू जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला होता. तरुणीच्या प्रतिज्ञापत्रानंतर या आंदोलनाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पोलिसांची पुढील चौकशी
पोलीस सूत्रांनी सांगितले की, तरुणीचे प्रतिज्ञापत्र नोंदविण्यात आले असून तक्रारीतील आरोप व नव्या निवेदनातील बाबींची पडताळणी केली जात आहे. अपहरण, जबरदस्ती, चोरी आदी कलमांबाबत पुढील कायदेशीर निर्णय चौकशीअंती घेतला जाणार आहे.
पार्श्वभूमी
भिगवणमध्ये १७ फेब्रुवारी रोजी दाखल तक्रारीनुसार तरुणीचे अपहरण झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर सोशल मीडियावर व राजकीय पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. दोन दिवसांनंतर तरुणी स्वतःहून समोर येत प्रेमसंबंधातून निघून गेल्याचा खुलासा केल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.


