पुणे प्रतिनिधी
पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब विजेते पैलवान सिकंदर शेख यांच्यावर आखाड्यातच हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने कुस्ती क्षेत्रात खळबळ उडाली आहे. तासभर रंगलेल्या अटीतटीच्या लढतीदरम्यान प्रतिस्पर्धी पैलवान माऊली कोकाटे यांच्या समर्थकाने अचानक आखाड्यात घुसून सिकंदर शेख यांच्यावर हात उगारल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असून कुस्तीप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.
१७ फेब्रुवारी रोजी पौड येथे ११ लाख रुपयांच्या बक्षिसाची मानाची मल्लिकार्जुन किताब कुस्ती रंगली होती. सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे या दोन्ही नामांकित पैलवानांमध्ये तब्बल एक तास झुंज रंगली. आंतरराष्ट्रीय पंच रोहिदास आप्पा यांच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या या लढतीला प्रेक्षकांची मोठी उपस्थिती लाभली होती. निकाल लागत नसतानाही कुस्ती सुरू ठेवण्याची आयोजकांची घोषणा झाल्याने दोन्ही पैलवान आक्रमकपणे झुंज देत होते.
दरम्यान, झुंजीदरम्यान झालेल्या एका हालचालीवरून दोन्ही पैलवानांमध्ये शाब्दिक वाद निर्माण झाला. त्याच वेळी माऊली कोकाटे यांचा एक समर्थक अचानक आखाड्यात घुसला व सिकंदर शेख यांच्यावर हात उगारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही समर्थकांनीही मैदानात धाव घेतल्याने क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
स्थिती चिघळताच सिकंदर शेख यांचे गुरू विशाल हारगुळे यांनी तत्काळ हस्तक्षेप करून दोन्ही पैलवानांना शांत केले. आयोजकांनी कुस्ती पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला; मात्र वातावरण तणावपूर्ण राहिल्याने अखेर दोन्ही पैलवानांना संयुक्त विजेते घोषित करून स्पर्धा संपवण्यात आली.
घटनेनंतर सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित होताच कुस्तीप्रेमींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “आखाड्यात समर्थकांचा हस्तक्षेप ही परंपरेला बाधा,” “महाराष्ट्र केसरीवर मैदानातच हल्ला ही गंभीर बाब,” अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. कुस्ती स्पर्धांमध्ये सुरक्षा व शिस्तीबाबत कडक नियमांची गरज असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, या घटनेबाबत आयोजक व स्थानिक पातळीवर चौकशीची मागणी होत असून, अशा प्रकारांमुळे पारंपरिक कुस्तीच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.


