पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची (एसएससी) राज्य मंडळ परीक्षा आज (२० फेब्रुवारी)पासून सुरू होत आहे. राज्यभरातील तब्बल १६,१५,४८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून, ही संख्या गतवर्षीपेक्षा ३,८७९ ने अधिक आहे. सध्या बारावीची परीक्षा सुरू असतानाच दहावीच्या परीक्षेचीही धामधूम सुरू झाली आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत परीक्षेच्या आयोजनाची माहिती दिली. यावेळी मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी उपस्थित होते. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत परीक्षा घेण्यात येणार आहे. परीक्षार्थ्यांनी नियोजित वेळेच्या किमान अर्धा तास आधी केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. सकाळच्या सत्रासाठी १०.३० वाजता, तर दुपारच्या सत्रासाठी २.३० वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहावे लागणार आहे.
दरम्यान, बारावीच्या परीक्षेदरम्यान काही ठिकाणी सामूहिक गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर दहावीच्या परीक्षेत अशा प्रकारांना आळा घालण्याचे मोठे आव्हान मंडळासमोर आहे. यंदा राज्यभर ५,१११ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार असून, देखरेखीकरिता २७१ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. गतवर्षी ५,१३० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती; मात्र गैरप्रकार आढळलेल्या ३१ केंद्रांवर कारवाई करून ती रद्द करण्यात आली आहे.
केंद्र परिसरात निर्बंध
शिक्षण विभागाच्या ९ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा दक्षता समित्यांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील छायाप्रती (झेरॉक्स) दुकाने परीक्षा कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत.
नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा
पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत राज्यभर परीक्षा पार पडणार आहे. मंडळाने विद्यार्थ्यांना वेळेत केंद्रावर पोहोचण्याचे आवाहन केले असून, नियमांचे काटेकोर पालन करण्यावर भर देण्यात आला आहे.


