सातारा प्रतिनिधी
हजारो मशालींच्या तेजोमय प्रकाशात इतिहास साक्षात उजळून निघावा, असा देखणा नजारा बुधवारी सायंकाळी किल्ले अजिंक्यताऱ्यावर अनुभवायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित शिवजयंती महोत्सवाचा प्रारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

राज्याचे मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत किल्ल्याच्या पायथ्यापासून मशाल फेरी काढण्यात आली. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या शिवभक्तांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला.
मशालींच्या रांगांनी किल्ल्याचा मार्ग उजळून निघाला असताना गडमाथ्यावर पोहोचलेल्या शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीम पथकांच्या तालावर सादर झालेल्या पारंपरिक सादरीकरणांनी वातावरण भारावून गेले.

कार्यक्रमप्रसंगी बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेचे आजच्या पिढीसाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले. “अजिंक्यतारा हा केवळ किल्ला नसून स्वाभिमानाचे प्रतीक आहे. शिवजयंती उत्सवातून तरुणाईत इतिहासाबद्दल अभिमान जागवणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनीही साताऱ्यातील शिवजयंती परंपरा अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त केला. महोत्सवाच्या निमित्ताने पुढील काही दिवस किल्ल्यावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने आणि पारंपरिक खेळांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
शिवजयंती महोत्सवाच्या प्रारंभीच हजारो मशालींच्या प्रकाशात उजळलेला अजिंक्यतारा किल्ला आणि शिवभक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती यामुळे साताऱ्यातील उत्सवाची दिमाखदार सुरुवात झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


