सातारा प्रतिनिधी
श्री शिवछत्रपती वाचनालय आणि ज्ञानविकास मंडळ, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सरस्वती व्याख्यानमाला’चे आयोजन करण्यात आले असून २० ते २२ फेब्रुवारीदरम्यान विविध विषयांवरील व्याख्याने आणि सांगीतिक कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना लाभणार आहे. दररोज सायंकाळी ५.३० वाजता अजिंक्य कॉलनी येथील वाचनालयाच्या सभागृहात कार्यक्रम होणार आहेत.
व्याख्यानमालेचा प्रारंभ शुक्रवारी (२० फेब्रुवारी) उद्योजक प्रसाद जोशी यांच्या ‘नवे शैक्षणिक धोरण : रचना आणि अंमलबजावणी’ या विषयावरील व्याख्यानाने होईल. शनिवारी (२१ फेब्रुवारी) शशिकांत प्रल्हाद लाटकर आणि सहकाऱ्यांकडून मराठी भावगीत व चित्रपटगीतांचा सांगीतिक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. तर व्याख्यानमालेचा समारोप रविवारी (२२ फेब्रुवारी) इतिहासतज्ज्ञ डॉ. ए. एन. पाटील यांच्या ‘पानिपत युद्धानंतरचा मराठा इतिहास’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे.
कुबेऱ विनायक मंदिराजवळील श्री शिवछत्रपती वाचनालयाच्या सभागृहात होणाऱ्या या व्याख्यानमालेस साताऱ्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


