कराड प्रतिनिधी
सह्याद्री परिसरात समुदाय-आधारित संवर्धन आणि मानव–वन्यजीव सहअस्तित्व अधिक प्रभावी करण्यासाठी सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्र आणि लास्ट वाइल्डरनेस फाउंडेशन यांच्यात कराड येथे सामंजस्य करार करण्यात आला. हा करार १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०३१ या कालावधीसाठी लागू राहणार आहे.
सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्राचे संचालक तुषार चव्हाण आणि लास्ट वाइल्डरनेस फाउंडेशनच्या संचालक विद्या वेंकटेश यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी उपसंचालक किरण जगताप, स्नेहलता पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनक्षेत्रपाल संग्राम गोडसे तसेच संस्थेचे केदार भिडे उपस्थित होते.
पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या सह्याद्री पट्ट्यात चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना वन्यजीव अभयारण्य आणि राधानगरी वन्यजीव अभयारण्य यांचा समावेश होतो. या प्रदेशात वाघ, बिबट्या, गौर, अस्वल, सांबर, रानकुत्रा तसेच अनेक स्थानिक व दुर्मिळ प्रजातींचे वास्तव्य आहे.
कराराअंतर्गत संरक्षित क्षेत्रालगतच्या गावांमध्ये समुदाय सहभाग वाढविणे, संवर्धनाविषयी जनजागृती, स्थानिक क्षमतावृद्धी, मानव–वन्यजीव संघर्ष निवारण तसेच ग्रामपातळीवरील संरक्षण सहकार्य या मुद्द्यांवर काम करण्यात येणार आहे. हे उपक्रम राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि महाराष्ट्र वन विभागाच्या नियमांनुसार राबविले जातील.
तुषार चव्हाण म्हणाले, ‘सह्याद्रीसारख्या विस्तीर्ण व संवेदनशील भूप्रदेशात दीर्घकालीन संवर्धनासाठी स्थानिक समुदायांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक आहे. या भागीदारीमुळे सहअस्तित्वाची यंत्रणा अधिक सक्षम होईल आणि गावपातळीवरील सहभागात्मक संवर्धनाला चालना मिळेल.’
विद्या वेंकटेश म्हणाल्या, ‘व्याघ्र राखीव क्षेत्र प्रशासन व स्थानिक समुदायांसोबत काम करताना समुदाय संवर्धन प्रक्रियेचा भाग बनला तर परिणाम अधिक सकारात्मक दिसून येतात. सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रासोबतची ही भागीदारी पश्चिम घाटात समुदाय-आधारित संवर्धनाचा आराखडा विकसित करण्यास उपयुक्त ठरेल.’


