सातारा प्रतिनिधी
सातारा जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत नसतानाही अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाकडेच राहील, असा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. “जागा अपेक्षेपेक्षा कमी आल्या असल्या तरी अध्यक्षपदासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू,” असे ते म्हणाले. या विधानामुळे जिल्हा परिषदेत सत्तासंघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला ६५ पैकी २७ जागा मिळाल्या असून तो सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (२०) आणि शिवसेना (१५) या आघाडीने मिळून बहुमताचा आकडा गाठला आहे. निवडणूकपूर्व आघाडीमुळे या दोन पक्षांकडे सत्तास्थापनेची संख्याबळाची आघाडी आहे.
भाजपचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना गोरे यांनी, “जागा कमी आल्या म्हणून अध्यक्षपदावरचा दावा सोडणार नाही. नेतृत्व पातळीवर सामूहिक प्रयत्न केले जातील,” असे स्पष्ट केले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी अपेक्षित एकहाती सत्ता मिळविण्यात कमी पडल्याची कबुलीही त्यांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस–शिवसेना आघाडीने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू केल्याचे संकेत आहेत. अशा परिस्थितीत अध्यक्षपदाच्या निवडीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


