नवी दिल्ली वृत्तसंस्था
राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या सादरीकरणाबाबत केंद्र सरकारने नवे प्रोटोकॉल जाहीर केले असून, यापुढे सर्व अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये या गीताची संपूर्ण सहा कडवी वाजवणे किंवा गाणे अनिवार्य राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने २८ जानेवारी रोजी जारी केलेल्या सुमारे दहा पानी निर्देशांमध्ये या संदर्भातील सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट करण्यात आली आहेत.
‘जन गण मन’ या राष्ट्रगीताप्रमाणेच ‘वंदे मातरम्’ सुरू असताना उपस्थितांनी सावधान स्थितीत उभे राहणे बंधनकारक राहील, असेही या निर्देशांत नमूद आहे. यापूर्वी प्रामुख्याने गीतातील पहिली दोन कडवी सादर करण्याची प्रथा होती; मात्र बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सहा कडव्यांच्या सादरीकरणावर भर देण्यात आला आहे.
गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार तिरंगा फडकावण्याचे कार्यक्रम, राष्ट्रपतींचे अधिकृत आगमन, त्यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी किंवा राष्ट्राला संबोधनापूर्वी ‘वंदे मातरम्’ वाजवणे अपेक्षित आहे. राज्यपालांच्या आगमनावेळी तसेच त्यांच्या भाषणाच्या प्रारंभी आणि समारोपाच्या वेळीही हे गीत सादर करण्याचा निर्देश देण्यात आला आहे.
राष्ट्रीय गीत आणि राष्ट्रगीत एकाच कार्यक्रमात सादर करावयाचे असल्यास प्रथम ‘वंदे मातरम्’ आणि त्यानंतर ‘जन गण मन’ वाजवावे, अशी क्रमवारीही स्पष्ट करण्यात आली आहे. ‘वंदे मातरम्’ची अधिकृत कालमर्यादा सुमारे ३ मिनिटे १० सेकंद इतकी निश्चित करण्यात आली आहे.
सरकारच्या मते, या निर्णयामागे देशभक्तीची भावना दृढ करणे आणि राष्ट्रीय प्रतीकांविषयी आदराची जाणीव अधिक ठळक करणे हा उद्देश आहे. मात्र, या बदलामुळे सरकारी शिष्टाचारात लक्षणीय फेरबदल होणार असून संबंधित विभागांना नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तयारी करावी लागणार आहे.
राष्ट्रीय गीताच्या सादरीकरणासंबंधीच्या या नव्या नियमांमुळे शासकीय कार्यक्रमांची रूपरेषा आणि प्रोटोकॉल अधिक औपचारिक आणि संरचित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


