नवी दिल्ली वृत्तसंस्था
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ चे विजेतेपद पटकावत इतिहासात आपले नाव कोरले. ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या अंतिम सामन्यात RCB ने दिल्ली कॅपिटल्सचा सहा विकेट्सने पराभव करत दुसऱ्यांदा WPL ट्रॉफी उंचावली.
याआधी RCB ने २०२४ मध्ये विजेतेपद मिळवले होते. मुंबई इंडियन्सने २०२३ आणि २०२५ या हंगामांत विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली आहे. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला; मात्र यंदाही त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
विजेत्यांवर कोटींचा वर्षाव
WPL २०२६ चे विजेतेपद मिळाल्यानंतर RCB संघाला ६ कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळाली. उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीसाठी ३ कोटी रुपये देण्यात आले.
WPL च्या पहिल्या हंगामापासून ही बक्षीस रक्कम कायम ठेवण्यात आली आहे. आतापर्यंत मुंबई इंडियन्सने दोन वेळा विजेतेपद मिळवत प्रत्येकी ६ कोटी रुपयांची कमाई केली आहे. २०२४ मध्ये RCB नेही हीच रक्कम मिळवली होती.
दरम्यान, यंदा एलिमिनेटरपर्यंत मजल मारणाऱ्या गुजरात जायंट्सला दिल्लीकडून पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांना कोणतीही बक्षीस रक्कम मिळू शकली नाही.
वैयक्तिक कामगिरीसाठी विशेष पुरस्कार
या हंगामात वैयक्तिक कामगिरीसाठीही खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव झाला.
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा), पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) आणि स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू यांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्यात आले. तसेच सर्वाधिक षटकार आणि सर्वोत्तम स्ट्राइक रेटसाठीही प्रत्येकी ५ लाखांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले.
ऑरेंज कॅप स्मृती मानधनाने, तर पर्पल कॅप सोफी डिव्हाइनने पटकावली. हरमनप्रीत कौरला सर्वाधिक षटकारांसाठी, तर ग्रेस हॅरिसला ‘सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन’ हा पुरस्कार मिळाला.
अंतिम सामन्यात ऐतिहासिक धावांचा पाठलाग
अंतिम सामना RCB साठी संस्मरणीय ठरला. प्रथम फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्सने २०३ धावा उभारल्या आणि RCB समोर २०४ धावांचे आव्हान ठेवले. WPL च्या इतिहासातील हा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग ठरला.
RCB ने १९.४ षटकांत अवघ्या चार गडी गमावत हे लक्ष्य गाठले. स्मृती मानधना आणि जॉर्जिया वॉल यांच्या अर्धशतकांनी या ऐतिहासिक विजयाचा पाया रचला आणि बंगळुरू संघाने पुन्हा एकदा WPL वर आपली छाप पाडली.


