सातारा प्रतिनिधी
खंडाळा तालुक्यातील सुखेड गावाच्या हद्दीत विहिरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ पोलिसांनी ७२ तासांत उकलले असून, या प्रकरणी नवी मुंबईतील एका पोलिस हवालदारासह चौघांना अटक करण्यात आली आहे. मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून नियोजनपूर्वक हत्या केल्याची कबुली संशयितांनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सुखेड परिसरातील विहिरीत २५ ते ३० वयोगटातील अज्ञात तरुणाचा मृतदेह हातपाय बांधलेल्या आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणंद पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. प्राथमिक तपासात मृताची ओळख सोमनाथ कल्याण बोबडे (रा. सेक्टर २०, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड) अशी पटली.
ही हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय बळावल्याने सातारा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि लोणंद पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला. फलटणचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल खांबे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेतला.
तपासादरम्यान एका संशयित कारचा धागा लागला. सलग तीन दिवसांच्या तपासानंतर कळंबोली येथे तरुणाला बोलावून कट रचून त्याची हत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर मृतदेह साताऱ्यातील सुखेड परिसरात आणून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने जाळण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी बंडू बापू भिसे (रा. कळंबोली, मूळ रा. दुधेबावी, ता. फलटण), विजय पोपटराव पवार (रा. साखरवाडी, ता. फलटण), किरण विकास गायकवाड (मूळ रा. होळ, ता. फलटण, हल्ली रा. पारी चौक, पुणे) आणि श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे (रा. चुरमापुरी, ता. अंबड, जि. जालना, हल्ली रा. रायकर मळा, धायरी, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक आरोपी नवी मुंबईत पोलिस हवालदार म्हणून कार्यरत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असून, कटात इतर कोणी सहभागी होते का, याचाही तपास पोलिसांकडून केला जात आहे.


