यवतमाळ प्रतिनिधी
घाटंजी तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुख्याध्यापक किशोर मालवीय (वय ५०) याला अटक केली असून त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यासह भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धमकी आणि दबावाखाली रात्रीची भेट
पोलिस तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीला दीर्घकाळ मानसिक दबावाखाली ठेवत वारंवार त्रास दिला होता. “मी सांगितले तेव्हा भेटायला आलेच पाहिजे. कुणाला काही सांगितलेस तर तुला जीवे मारीन,” अशी धमकी देत तो तिला गप्प राहण्यास भाग पाडत होता.
५ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे ११ वाजता मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीच्या वडिलांच्या मोबाइलवरून फोन केला. त्या वेळी मोबाइल विद्यार्थिनीकडेच असल्याने ती घाबरली. धमकीच्या भीतीने ती गावातील बसस्थानकावर गेली. तेथे मुख्याध्यापक चारचाकी वाहनात थांबलेला होता. परिस्थितीचा गैरफायदा घेत त्याने विद्यार्थिनीला वाहनात बसवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
यापूर्वीही अत्याचाराचा आरोप
तक्रारीनुसार, ही पहिलीच घटना नसून, याआधीही मे २०२५ मध्ये मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीला शाळेतील डिजिटल खोलीत बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, आरोपीकडून सातत्याने दिल्या जाणाऱ्या धमक्यांमुळे आणि भीतीपोटी विद्यार्थिनीने हा प्रकार कुणालाही सांगितला नव्हता.
घरी सांगितल्यावर प्रकरण उघड
अत्याचारानंतर कशी तरी आरोपीच्या तावडीतून सुटून विद्यार्थिनी घरी पोहोचली. घरी आल्यानंतर ती रडत असल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी चौकशी केली. त्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. मुलीच्या वडिलांनी ७ फेब्रुवारी रोजी घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
आरोपी अटकेत; कार जप्त
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत आरोपीला यवतमाळ येथून ताब्यात घेतले. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४(२), ६५(१), ३५१(३) तसेच पोक्सो कायद्यांतर्गत सहकलम ४(६) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. न्यायालयाने आरोपीला २१ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी कार पोलिसांनी जप्त केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दिव्यात सहा वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील दिवा परिसरात आणखी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शिळफाटा येथील खान कंपाउंड परिसरात राहणारी सहा वर्षीय चिमुकली शुक्रवारी घराबाहेर खेळण्यासाठी गेली होती. मात्र, सायंकाळी ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधमोहीम सुरू केली.
शनिवारी सकाळी या मुलीचा मृतदेह घराजवळील पाण्याने भरलेल्या डबक्यात आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, नेमका मृत्यू कसा झाला याचा तपास सुरू आहे.


