सिन्नर प्रतिनिधी
अजित पवार यांच्या निधनाने आधीच शोकसागरात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा दु:खाचे सावट पसरले आहे. सिन्नर विधानसभेचे आमदार आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वडील शिवाजीराव मुरलीधर कोकाटे यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राजकीय तसेच सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
शिवाजीराव कोकाटे यांनी कोळपेवाडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून काम पाहिले होते. सहकार क्षेत्रात त्यांनी अनेक वर्षे नेतृत्व केले. सामाजिक जीवनात सक्रिय असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात तीन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंतिम यात्रा सिन्नर तालुक्यातील सोमठाणे येथून निघाली. अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवाजीराव कोकाटे यांच्या निधनाबद्दल विविध नेत्यांनी शोकभावना व्यक्त केल्या. आमदार विजयसिंह पंडित यांनी, “माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे वडील शिवाजीराव कोकाटे यांच्या निधनाची बातमी दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कोकाटे कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे,” असे म्हटले.
मंत्री छगन भुजबळ यांनीही सोमठाणे येथे उपस्थित राहून अंत्यदर्शन घेतले. “माणिकराव कोकाटे यांना पितृशोक झाला असून हा त्यांच्या कुटुंबासाठी मोठा आघात आहे. या दुःखद प्रसंगी कोकाटे कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त करतो,” असे भुजबळ यांनी सांगितले.


