खोपोली प्रतिनिधी
मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीतील बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी प्रोपिलीन वायूने भरलेला टँकर उलटल्याने गेल्या १८ तासांपासून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. टँकरमधून गॅसगळती वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई लेन बंद ठेवण्यात आली असून, पुणे लेनवर तब्बल १० ते १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्वलनशील प्रोपिलीन वायूच्या गळतीमुळे अपघातस्थळी धोका वाढला आहे. त्यामुळे आडोशी बोगद्याच्या परिसरात सुरक्षेचे कारण पुढे करत मुंबईच्या दिशेची वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी, पुण्याच्या बाजूने खालापूर टोल नाक्यापर्यंत तीव्र वाहतूक कोंडी झाली आहे.
गॅसगळती आटोक्यात येईपर्यंत वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. एनडीआरएफसह आपत्ती व्यवस्थापन पथके घटनास्थळी कार्यरत असून टँकर सुरक्षितपणे हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, पुणे ते मुंबई प्रवासासाठी किमान सात तासांहून अधिक वेळ लागत असून, काही वाहनचालकांनी दीर्घ प्रतीक्षेनंतर युटर्न घेत परतीचा प्रवास सुरू केला. पुण्याहून सुरू होणाऱ्या द्रुतगती मार्गावर टोल नाक्यापर्यंत पोहोचण्यासाठीही दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे चित्र आहे.
पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
वाहतूक पोलिसांनी लोणावळा–खंडाळा मार्ग पूर्णतः टाळण्याचे आवाहन केले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील पर्यायी मार्ग सुचवण्यात आले आहेत.
ताम्हिणी घाट मार्ग : पुणे–पौड–ताम्हिणी–माणगाव–मुंबई (दक्षिण मुंबईसाठी उपयुक्त)
माळशेज घाट मार्ग : पुणे–चाकण–नारायणगाव–माळशेज–कल्याण/ठाणे (उपनगरांसाठी उपयुक्त)
प्रवासाचा वेळ ३ ते ५ तासांनी वाढू शकतो, त्यामुळे वाहनचालकांनी पुरेसे इंधन व पाणी सोबत ठेवावे, असेही आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


