कल्याण : प्रतिनिधी
कल्याण रेल्वे स्थानकात काही क्षणांतच एका प्रवाशाचा जीव जाण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र आरपीएफच्या जवानाच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसी कृतीमुळे हा अनर्थ टळला. गाडीच्या डब्बा आणि प्लॅटफॉर्ममधील धोकादायक अंतरात अडकलेल्या कर्करोगग्रस्त वृद्ध प्रवाशाचे प्राण आरपीएफ हेड कॉन्स्टेबल शरद घरटे यांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचवले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष सन्मान करण्यात येणार आहे.
उत्तर प्रदेशातील झाशी येथील रहिवासी राजेंद्र शुक्ला (वय ६०) हे उपचारासाठी ठाण्यातील मेडिसिटी रुग्णालयात जात होते. पत्नी आणि मुलासह ते राजधानी एक्सप्रेसने प्रवास करत होते. कल्याण स्थानकात उतरल्यानंतर एसी कोचमध्ये काही सामान राहिल्याचे लक्षात येताच ते ते परत घेण्यासाठी डब्ब्यात गेले. मात्र याचदरम्यान गाडीने हालचाल सुरू केली. घाईत उतरण्याचा प्रयत्न करत असताना शुक्ला यांचा तोल गेला आणि ते डब्बा व प्लॅटफॉर्ममधील मधल्या गॅपमध्ये अडकले.
घटनेने स्थानकावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र ऑन-ड्युटी असलेले आरपीएफ हेड कॉन्स्टेबल शरद घरटे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखत क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली. त्यांनी इतरांच्या मदतीने शुक्ला यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. काही सेकंद उशीर झाला असता, तर गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता होती, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
या घटनेनंतर शुक्ला यांना प्राथमिक उपचार देण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या जीवाचे रक्षण करणाऱ्या आरपीएफ जवानाबद्दल शुक्ला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, कल्याण आरपीएफ स्टेशनचे प्रभारी पी. आर. मीना यांनी हेड कॉन्स्टेबल शरद घरटे यांच्या धाडसाचे आणि कर्तव्यनिष्ठेचे कौतुक केले. आरपीएफ मुंबई विभागाचे वरिष्ठ डीएससी ऋषी शुक्ला यांनी या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांचा सन्मान करण्याची घोषणा केली आहे. कल्याण आरपीएफ स्टेशनकडून त्यांना १,००१ रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरवण्यात येणार आहे.
रेल्वे स्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सतर्कता आणि तत्परतेचे महत्त्व अधोरेखित करणारी ही घटना ठरली असून, आरपीएफ जवानांच्या कामगिरीबद्दल नागरिकांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे.


