नवी दिल्ली वृत्तसंस्था
सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय टपाल विभागामार्फत २०२६ साठी ग्रामीण डाक सेवक (GDS) पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, देशभरात २५ हजारांहून अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरतीची खास बाब म्हणजे उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही.
टपाल विभागाने काही दिवसांपूर्वी या भरतीची अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार, २० जानेवारी २०२६ पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ४ फेब्रुवारी २०२६ ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. दहावीच्या गुणांच्या आधारे थेट मेरिट लिस्ट तयार करून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, दहावीमध्ये गणित आणि स्थानिक भाषा विषय असणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवाराला सायकल चालवता येणे अपेक्षित आहे. अर्ज करताना दहावीची गुणपत्रिका सादर करावी लागणार आहे.
ही भरती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येणार असून, देशाच्या कोणत्याही भागातून उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख ५ फेब्रुवारी २०२६ रात्री ११ वाजेपर्यंत आहे. अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी ८ ते १० फेब्रुवारी २०२६ दरम्यान संधी देण्यात येणार आहे.
टपाल विभागाकडून २० फेब्रुवारी २०२६ रोजी मेरिट लिस्ट जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भरतीची उमेदवार आतुरतेने वाट पाहत होते. त्यामुळे दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी ही केंद्र शासनात नोकरी मिळवण्याची महत्त्वाची संधी ठरणार आहे.
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्जाची सुरुवात : २० जानेवारी २०२६
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ४ फेब्रुवारी २०२६
शुल्क भरण्याची अंतिम तारीख : ५ फेब्रुवारी २०२६ (रात्री ११ वाजेपर्यंत)
अर्ज दुरुस्ती कालावधी : ८ ते १० फेब्रुवारी २०२६
मेरिट लिस्ट जाहीर : २० फेब्रुवारी २०२६


