नवी दिल्ली वृत्तसंस्था
प्रजासत्ताक दिनाच्या ७७व्या वर्धापनदिनानिमित्त राजधानीतील कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ सज्ज झाला आहे. यंदा राज्याच्या वतीने ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर करण्यात येणार असून, महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, सामाजिक चळवळ आणि आर्थिक सामर्थ्य यांचे समग्र दर्शन या माध्यमातून घडवण्यात येणार आहे.
यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा राष्ट्रीय गीत **‘वंदे मातरम्’ ला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
युरोपियन संघाचे नेतृत्व प्रमुख पाहुणे
प्रजासत्ताक दिन सोहळ्याला युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सादर होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ राज्याची प्रदीर्घ सांस्कृतिक परंपरा आणि बदलत्या भारतातील आर्थिक वाटचाल अधोरेखित करणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव : सामाजिक चळवळीपासून राज्य महोत्सवापर्यंत
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य आणि राष्ट्रभावना जागृत केली. हीच चळवळ आज आधुनिक भारताला आत्मनिर्भरतेकडे नेण्यात कशी महत्त्वाची ठरत आहे, याचे प्रभावी चित्रण या चित्ररथात करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने होणारी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार, सजावट कलाकार, कारागीर आणि सेवा क्षेत्रातील असंख्य घटकांना मिळणारा शाश्वत रोजगार तसेच त्यातून निर्माण होणारी व्यापक आर्थिक साखळी या चित्ररथाचा केंद्रबिंदू आहे.
महाराष्ट्र शासनाने सन २०२५ पासून सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून मान्यता दिली असून, या उत्सवामुळे सांस्कृतिक समृद्धीसोबतच पर्यावरणपूरक आणि आर्थिक आत्मनिर्भरतेलाही चालना मिळते, हा संदेश ठळकपणे मांडण्यात आला आहे.
कलात्मक रचनेतून महाराष्ट्राचे दर्शन
महाराष्ट्राच्या चित्ररथाची रचना अत्यंत कलात्मक असून ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी आहे.
चित्ररथाच्या अग्रभागी महाराष्ट्राच्या ऊर्जेचे प्रतीक असलेला भव्य ढोल आणि तो वाजवणारी पारंपरिक वेशभूषेतील महिला राज्यातील स्त्रीशक्तीचे प्रतीक म्हणून साकारण्यात आली आहे.
मध्यभागी गणपती बाप्पाची मूर्ती घडवणारा मूर्तिकार आणि विसर्जनासाठी निघालेला भक्त दाखवण्यात आला आहे.
चित्ररथाच्या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्राच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या अष्टविनायक मंदिरांची भव्य प्रतिकृती साकारली आहे.
दोन्ही बाजूंनी पारंपरिक नऊवारी साडीतील महिलांचे लेझीम पथक सहभागी होणार असून, इतरही लोककला आणि सांस्कृतिक घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
‘भारत पर्व’मध्येही महाराष्ट्राचे सादरीकरण
‘जनभागीदारी’वर आधारित हा सोहळा पथसंचलनानंतरही अनुभवता येणार आहे. २६ ते ३१ जानेवारीदरम्यान लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात येणाऱ्या ‘भारत पर्व’ या उपक्रमातही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक समृद्धीचा आणि आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचा अनुभव देशवासीयांना घेता येणार आहे.


