नंदुरबार प्रतिनिधी
अधिक नफ्याच्या हव्यासापोटी मानवी आरोग्याबरोबरच दुभत्या जनावरांच्या जीविताशी खेळ करणारा गंभीर प्रकार नंदुरबार शहरात उघडकीस आला आहे. गायी व म्हशींकडून अधिक दूध मिळावे, यासाठी त्यांना घातक रसायनांचे इंजेक्शन दिले जात असल्याचा प्रकार स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत समोर आला असून, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सुमारे २० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नंदुरबार शहरातील नवा गवळीवाडा परिसरात छापा टाकण्यात आला. एका घरालगतच्या गोदामात दूध वाढविण्यासाठी वापरली जाणारी घातक रसायने साठवून ठेवण्यात आली असल्याचे आढळून आले. ही रसायने एकत्र करून ती इंजेक्शनद्वारे दुभत्या जनावरांना दिली जात होती. या इंजेक्शनमुळे तात्पुरते दूध उत्पादन वाढत असले, तरी असे दूध मानवी आरोग्यास अत्यंत धोकादायक ठरू शकते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
छाप्यावेळी पश्चिम बंगालमधील आशिक लियाकत सरदार हा बाटल्यांमध्ये रसायने भरताना आढळून आला. या प्रकरणात घरमालक तुकाराम गवळी यालाही अटक करण्यात आली आहे. रसायनांमुळे तयार होणारे दूध मानवी जीवनास हानीकारक असून, त्याचबरोबर दुभत्या जनावरांच्या जीवितालाही धोका संभवतो, याची जाणीव असूनही आरोपींनी हा प्रकार केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस. यांनी प्रकरणात लक्ष घातले असून, जप्त केलेली रसायने कुठून आणली गेली, तसेच ती कोणाकोणाला विक्री केली जात होती, याचा सखोल तपास सुरू आहे. या टोळीचे शहरासह जिल्ह्यातील इतर भागांमध्येही जाळे पसरले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे नंदुरबार शहरात विक्री होणाऱ्या दुधाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने अधिक सतर्कता बाळगून शहरातील दूध डेअरी आणि विक्रेत्यांकडे भेसळ तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


