परभणी प्रतिनिधी
परभणीतील संविधान विटंबना प्रकरणाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील आरोपी दत्ता सोपान पवार याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. तब्बल १३ महिने तुरुंगवास भोगल्यानंतर काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटलेला पवार मिर्झापूर (ता. परभणी) येथील आपल्या शेतातील खोलीत मृतावस्थेत आढळून आला.
दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात आला असून, आत्महत्येमागील कारणांचा सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दत्ता सोपान पवार याला दोन ते तीन दिवसांपूर्वी न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता. जामिनानंतर तो थेट आपल्या मूळ गावी मिर्झापूर येथे आला होता. गावात शांतपणे वास्तव्यास असतानाच आज सकाळी शेतातील खोलीत त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
१० डिसेंबर २०२४ रोजी परभणी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेनंतर जिल्ह्यासह राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणात दत्ता पवार याला आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तो सुमारे १३ महिने न्यायालयीन कोठडीत होता. या घटनेची दखल राष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली होती.
दीर्घ काळ तुरुंगवासानंतर जामीन मिळाल्याने तो पुन्हा सामान्य आयुष्याकडे वळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र जामीन मिळाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्याने आत्महत्या केल्याने या प्रकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. दत्ता पवारची पत्नी व दोन मुले पुणे येथे वास्तव्यास असून, इतर नातेवाईक परभणी जिल्ह्यातील विविध गावांत राहतात.
या घटनेनंतर मिर्झापूर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आधीच संवेदनशील असलेल्या संविधान विटंबना प्रकरणात आरोपीच्या आत्महत्येमुळे वातावरण अधिक तणावपूर्ण बनले आहे. आत्महत्येमागील नेमकी कारणे काय, याचा तपास पोलीस करत असून सर्व बाजूंनी चौकशी सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


