मुंबई प्रतिनिधी
‘श्रीमंती एका रात्रीत येत नाही’ असे म्हणले जाते. मात्र, तीच श्रीमंती तपास यंत्रणांच्या रडारवर आली, की एका रात्रीत संपूर्ण आयुष्य उलथापालथ होऊ शकते, याचा प्रत्यय सध्या भारत–नेपाळ सीमेवरील बिहारमधील रक्सौल शहरात येत आहे.
शुक्रवारी पहाटे साडेपाच–सहाच्या सुमारास शांत असलेल्या रक्सौलमध्ये अचानक प्रचंड हालचाल सुरू झाली. तब्बल ३६ वाहनांचा ताफा, दीडशेहून अधिक सशस्त्र जवान आणि केंद्रीय तपास यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी शहरात दाखल झाले. प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) यांच्या संयुक्त पथकाने शहरातील नामवंत व्यावसायिक मोहम्मद कलीम यांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी एकाच वेळी धाड टाकली.
ही कारवाई केवळ औपचारिक तपासापुरती मर्यादित न राहता तब्बल ३० तासांहून अधिक काळ सुरू असल्याने, ती रक्सौलच्या इतिहासातील सर्वात मोठी आणि दीर्घकालीन रेड ठरत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
सहा महिन्यांपासून पाळत, गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
हिरो मोटारसायकल एजन्सी आणि तनिष्क ज्वेलर्सचे मालक असलेले मोहम्मद कलीम हे रक्सौलमधील एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व मानले जातात. आयकर विभाग गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या आर्थिक व्यवहारांवर बारकाईने नजर ठेवून होता. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे, डायरेक्टर दर्जाच्या एका महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली ही उच्चस्तरीय कारवाई आखण्यात आली.
तपासाचा विस्तार केवळ कलीम यांच्या घरापुरता न राहता, त्यांच्या नातेवाईकांची ठिकाणे तसेच आश्रम रोडवरील त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंटच्या निवासस्थानीही झडती घेण्यात येत आहे.
मोठ्या प्रमाणात रोकड, सोनं आणि कागदपत्रांची जप्ती
तपास अद्याप सुरू असला तरी, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या धाडीत मोठ्या प्रमाणावर रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, जप्त रोख रकमेत २००० रुपयांच्या जुन्या नोटांचाही समावेश असल्याचे समजते. यामुळे संशय आणखी बळावला आहे.
यासोबतच मालमत्तेशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे, व्यवहारांचे दस्तऐवज आणि काही डिजिटल डेटा ताब्यात घेण्यात आला असून, बेनामी व्यवहारांचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
एसएसबीचा कडेकोट बंदोबस्त, शहरात तणावपूर्ण शांतता
कारवाईचे गांभीर्य लक्षात घेता, स्थानिक पोलिसांऐवजी सशस्त्र सीमा सुरक्षा दलाच्या (SSB) जवानांना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. रक्सौलच्या तांदूळ बाजार, परेवा परिसरासह पाच प्रमुख ठिकाणी सशस्त्र जवानांचा पहारा आहे. रस्ते, दुकाने आणि गल्लीबोळांत खाकी वर्दी दिसत असल्याने शहरात भीती आणि कुतूहलाचे मिश्र वातावरण निर्माण झाले आहे.
अधिकृत माहितीची प्रतीक्षा
या संपूर्ण कारवाईबाबत तपास यंत्रणांनी अद्याप कोणतीही अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही. “तपास पूर्ण झाल्यानंतरच जप्त करण्यात आलेल्या रकमेचा आणि मालमत्तेचा तपशील समोर येईल,” असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, रक्सौलसारख्या सीमावर्ती शहरात झालेल्या या अभूतपूर्व कारवाईने केवळ स्थानिकच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहारांचे खरे स्वरूप किती व्यापक आहे, हे स्पष्ट होणार आहे.


