बेंगळुरू:
लाचेची रक्कम अवघी काही लाखांची, मात्र तपासात उघडकीस आलेली ‘काळी कमाई’ थेट कोट्यवधत, असा धक्कादायक प्रकार बेंगळुरूमध्ये सीबीआयच्या छापेमारीत समोर आला आहे. केंद्रीय विद्युत संशोधन संस्था (सीपीआरआय) येथील संयुक्त संचालकाच्या निवासस्थानी केलेल्या कारवाईत तब्बल ३ कोटी ७६ लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
सीबीआयने ९.५ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून सीपीआरआयमध्ये कार्यरत असलेले संयुक्त संचालक राजाराम मोहनराव चेनू यांना अटक केली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला असता, अधिकाऱ्यांनाही थक्क करणारे दृश्य समोर आले. घरातील कपाटांमध्ये नव्हे, तर तीन मोठ्या सुटकेसमध्ये नोटांचे गठ्ठे ठासून भरलेले आढळून आले. रक्कम इतकी मोठी होती की तिची मोजणी करण्यासाठी यंत्रांची मदत घ्यावी लागली.
सीबीआयच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेली संपूर्ण रोकड आरोपी अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून मिळविल्याचा संशय आहे. लाचखोरीच्या या प्रकरणात लाच देणाऱ्यालाही अटक करण्यात आली असून, तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे.
या कारवाईत अतुल खन्ना, संचालक, मेसर्स सुधीर ग्रुप ऑफ कंपनीज यांनाही सह-आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. सरकारी यंत्रणेतल्या वरिष्ठ पदावरील अधिकाऱ्याकडून झालेल्या कथित भ्रष्टाचारामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडून सुरू असून, जप्त रकमेचा स्रोत आणि इतर संभाव्य सहभागींविषयी चौकशी करण्यात येत आहे.


