कल्याण प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि अपर पोलिस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने ग्रामीण भागात सुरू असलेल्या सरमाडी दारूच्या दोन हातभट्टी अड्ड्यांवर धाड टाकत मोठी कारवाई केली.
क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वडवली-शिरढोण गावाच्या सीमेवरील नदीकाठ आणि घेसर गावाच्या शिवारात सुरू असलेले हे अड्डे एका दमात उद्ध्वस्त करण्यात आले. या कारवाईत दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे सुमारे १२ हजार लिटर वॉश, तसेच साहित्य व रासायनिक पदार्थ असा एकूण ७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला.
ग्रामीण भागात गस्त घालत असताना कॉन्स्टेबल गोरक्ष शेकडे यांना या भागात सरमाडी दारूची अवैध निर्मिती सुरू असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर अजित शिंदे यांनी स्वतंत्र पथके तयार करून कारवाईचे आदेश दिले. सहाय्यक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, पोउपनि विनोद पाटील, किरण भिसे, सपोउपनि दत्ताराम भोसले आणि बालाजी शिंदे यांच्या पथकाने शनिवारी पहाटे ही धाडसत्रे राबवली.
वडवली-शिरढोण परिसरात राजेशकुमार रामयशस्वी यादव (३०, रा. घेसर) हा त्याच्या तिघा साथीदारांसह दारू गाळताना आढळून आला. या ठिकाणी ५० प्लास्टिक ड्रममधील सुमारे १० हजार लिटर वॉश नष्ट करण्यात आला. तर घेसर गावाच्या शिवारात नंदजी बुद्ध यादव (५५) याच्याकडून ५ हजार लिटर वॉश जप्त करून नष्ट करण्यात आला.
या दोन्ही प्रकरणी संबंधित दारूमाफियांविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (सी) (एफ) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दारूमाफियांनी पुन्हा अड्डे उभारू नयेत, यासाठी या ठिकाणांची पूर्णतः मोडतोड करण्यासाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. तसेच परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी रासायनिक पदार्थ निर्मनुष्य ठिकाणी जाळून नष्ट करण्यात आले.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलिस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले, उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांनी क्राईम ब्रँचच्या पथकाचे कौतुक केले आहे.


