कल्याण, प्रतिनिधी
कल्याण तालुक्यातील मामणोली गावाजवळ शिवसेना (शिंदे गट) नेते किरण घोरड यांची धारदार शस्त्रांनी निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघड झाली. ग्रामीण भागातील या हल्ल्यामुळे परिसरात तणाव पसरला असून शिवसैनिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून घोरड यांच्यावर एका टोळक्याने अचानक हल्ला चढवला. धारदार शस्त्रांचा वापर करून त्यांच्यावर सलग वार करण्यात आले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र उपचाराला सुरुवात होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
घोरड हे टिटवाळा परिसरातील गोवेली गावचे रहिवासी होते. घटनेची माहिती मिळताच कल्याण तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपासणी आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून काही संशयितांची चौकशीही पोलिसांकडून करण्यात येत असल्याचे समजते.
या हत्याकांडामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. घोरड यांच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पुढील तपास कल्याण तालुका पोलिसांकडून सुरू आहे.


