सातारा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापन झालेल्या महिला स्वयं-सहाय्यता गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात पहिल्या टप्प्यात १३ जिल्ह्यांत ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यास मान्यता देण्यात आली असून, त्यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
राज्यात सध्या हे अभियान ३४ जिल्ह्यांतील ३५१ तालुक्यांत राबविण्यात येत आहे. या माध्यमातून स्थापन झालेल्या महिला स्वयं-सहाय्यता गटांमधील महिला उपजीविकेसाठी विविध लघुउद्योग चालवत असून, त्यातून खाद्यपदार्थ, हस्तकला, वस्त्रोद्योग, गृहउपयोगी वस्तू आदींची निर्मिती होत आहे. मात्र, या उत्पादनांच्या विक्रीसाठी कायमस्वरूपी आणि विश्वासार्ह बाजारपेठेची गरज भासत होती.
या पार्श्वभूमीवर ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन, आठवडी बाजारांतील स्टॉल्स तसेच ‘उमेद मार्ट’ या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे महिलांना विक्रीची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासोबतच ॲमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या नामांकित ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही महिला गटांची नोंदणी करण्यात येत असल्याचे मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले.
महिला स्वयं-सहाय्यता गटांच्या उत्पादनांसाठी भौतिक स्वरूपातील हक्काची बाजारपेठ निर्माण करण्याच्या उद्देशाने आता ‘उमेद मॉल’ संकल्पना प्रत्यक्षात आणली जात आहे. पहिल्या टप्प्यात पुणे विभागातील सातारा, पुणे व सोलापूर; कोकण विभागातील रत्नागिरी-खेड व ठाणे-अंबरनाथ; नाशिक विभागातील जळगाव-भुसावळ; छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव-तुळजापूर; अमरावती विभागातील यवतमाळ व अकोला; तसेच नागपूर विभागातील वर्धा व नागपूर येथे हे मॉल उभारण्यात येणार आहेत.
या मॉलमधून महिला बचत गटांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार असून, ग्रामीण महिलांच्या आर्थिक सबलीकरणाला मोठा हातभार लागेल, असा विश्वासही मंत्री गोरे यांनी व्यक्त केला.


